आंबेडकरी समाज विचाराने जागतिक आहे

ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

ओझर्डे – या देशातील संत कबिरांचा विचार जागतिक आहे, छत्रपती शिवरायांचे शौर्य जागतिक आहे, महात्मा फुल्यांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देखील जागतिक आहे. आताच्या काळात वस्तूंचे जागतिकिकरण झाले असले तरी अडीच हजार वर्षांपूर्वी विचारांचे वैश्‍विकीकरण करणारा बुद्ध असून बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांची परंपरा ज्या समाजाला असते, तो आंबेडकरी समाज असतो.

-Ads-

त्यामुळे आंबेडकरी समाज लोकसंख्येने जरी अल्पसंख्यांक असला तरी तो विचाराने जागतिक असल्याचे मत जेष्ठ विचारवंत साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. भुईंज येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर-खंडाळा, समता सामाजिक व शैक्षणिक संस्था वाई आणि समविचारी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज चिंतन परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कांबळे बोलत होते.

यावेळी अशोकबापू गायकवाड, पंकजदादा धिवार, प्रा. डॉ. रोहिदास जाधव, प्रा. शिवाजी राऊत, सुरेश खराते, सुनीता केदार, भाऊसाहेब सपकाळ, विशाल सपकाळ, अमर बनसोडे, अमोल गाडे, पत्रकार तानाजी कचरे यांच्यासह मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.उत्तम कांबळे म्हणाले, ही समाज चिंतन परिषद म्हणजे भाषणबाजी नसून शिक्षण आहे, प्रबोधन आहे. विचारांचे मंथन आहे. आणि हे मंथन घडविण्यासाठी ग्रामीण भागातील काही तरुण एकत्र येऊन फुले, शाहू या आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार, प्रचार आणि विचार मंथन करीत आहेत हे कौतुकास्पद आहे.

यावेळी शाहीर संभाजी भगत, प्रा. शरद गायकवाड, डॉ. रमेश जाधव, माजी प्राचार्य सुरेश खराते, जेष्ठ विचारवंत सतिश कुलकर्णी, प्रा. बिपीन वैराट यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत जगदीश कांबळे यांनी तर प्रास्ताविक विशाल कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सुजाता भालेराव, आनंदा जाधव यांनी तर आभार स्वप्निल घोडके यांनी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)