आंबेडकरांची शिकवण आचरणात आणा

राजगुरूनगर-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून तरुण पिढीने आदर्श घ्यावा. त्यांनी दिलेली शिकवणीचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अरुण चांभारे यांनी केले.
सुपे (ता. खेड) येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण नुकतेच माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अरुण चांभारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि. प. सदस्या मंगल चांभारे, सुपे गावाच्या सरपंच लीलाबाई मुके, उपसरपंच मुकिंदा बुढे, सुपे गाव समस्थ बौद्धजन मंडळाचे अध्यक्ष राजू ससाणे, रमेश ससाणे, कोंडीराम ससाणे, देवेंद्र ओव्हाळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरुण चांभारे म्हणाले, सुपे गावातील नागरिकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून स्फूर्ती मिळावी यासाठी गावात पुतळा बसवला आहे. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा त्यांनी दिलेल्या मूलमंत्राप्रमाणे गावातील विद्यार्थी वर्गाने जोपासना करावी येथील पुतळ्याचे जतन करून त्यांची प्रेरणा घेत सर्वांनी काम करावे. गावात एकी ठेवून सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. यावेळी माजी सदस्या सुरेखाताई मोहिते पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या पुतळ्यासाठी अरुण चांभारे यांनी वैयक्तिक योगदान दिले असून त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव ससाणे यांनी केले. दत्तात्रेय मुळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)