मंचर- आंबेगाव वसाहत (ता. आंबेगाव) येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड येथील विज्ञान केंद्राला भेट देऊन स्वतः गाडीचे ग्रिल, ब्रेक आणि ऍक्सेलेटरचे कार्य करून पाहिले. ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, विविध ग्रहांची सौरमालेतील रचना, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे उपग्रह, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण यांची माहिती तारांगणाद्वारे घेतली. विज्ञान दिनाचे औचित्य साधून वैज्ञानिक सहलीचे आयोजन केले होते, अशी माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकुर यांनी दिली. विज्ञानातील गमतीजमती, हास्य गॅलरी, मानव आणि इतर प्राण्यांची उत्पत्ती, थोर शास्त्रज्ञ आणि त्यांनी केलेले प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. ऊर्जा रुपांतरणाचे विविध प्रकार, सौर, यांत्रिक, प्रकाश, ध्वनी, चुंबकीय ऊर्जा यावरील सुमारे तीनशे प्रयोग विद्यार्थ्यांना पाहावयास मिळाले. प्राण्यांचा अद्भुत थ्री-डी शो पाहुन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतुहुल आणि आनंद दिसला. बेन्टली सिस्टिम सॉफ्टवेअर कंपनी मगरपट्टा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वैज्ञानिक सहलीचा आनंद घेण्यास मिळाला.कंपनीचे सामाजिक विकास अधिकारी प्रथमेश कालेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.वैज्ञानिक सहलीचे आयोजन शिक्षक सुरेश बांगर, अनंता लोहकरे, वैशाली काळे, मनीषा आढळराव, वंदना मंडलिक, लक्ष्मी वाघ,गुलाब बांगर यांनी केले.
आंबेगाव वसाहतच्या विद्यार्थ्यांची विज्ञान केंद्राला भेट
Ads