आंबेगावात “महसूल’चा अनागोंदी कारभार

मंचर – आंबेगाव तालुक्‍यात महसूल खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त झाले आहेत. महाविद्यालात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांसाठी तलाठी कार्यालय ते तहसील कार्यालय असे रोज हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रवेश प्रक्रिया कालावधीत तरी तलाठ्यांना गावात दररोज थांबणे सक्तीचे करावे, अशी मागणी पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची शासकीय कॉलेज, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. एका तलाठ्याकडे पाच ते सहा गावांचा पदभार असल्याने विद्यार्थ्यांना सातबारा, आठ “अ’ उताऱ्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी तसेच उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी तलाठी शोधावा लागत आहे. काही तलाठी फोन बंद ठेवत असल्याने ते नक्‍की कोणत्या गावात काम करीत आहेत, हे समजत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्या दिवशी तलाठी कोणत्या गावात आहेत त्या गावाचे नाव व मोबाइल क्रमांकाचा फलक तलाठी कार्यालयात लावावा. तसेच फोन बंद ठेऊ नये, अशा सूचना तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी तालुक्‍यातील तलाठ्यांना द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

गेल्या एक महिन्यापासून महसूल विभागाचे सरोवर (इंटरनेट सेवा) वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना सातबारा, आठ “अ’ उतारे वेळेत मिळत नाहीत. उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठीही हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने तालुक्‍यात महा-ई-सेवा केंद्र सुरू केले आह; परंतु केंद्रचालक मनमानी करुन विद्यार्थ्यांकडून दाखले देण्यासाठी जास्त पैसे घेतात. तहसीलदार पैकेकरी यांनी महा-ईसेवा केंद्र चालकांना शासकीय दाखले आणि नवीन रेशनकार्ड काढण्यासाठीचे दरपत्रक सकृतदर्शनी भागात फलक लावावेत, अशी मागणी पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)