‘आंबा पिकतो अन्‌ पाऊस पडतो’…(प्रभात ब्लॉग)

– संतोष गव्हाणे, पुणे 

आमरसाच्या बेताचे वेध असल्ल खवय्यांना लागले असतानाच यंदा आंबा जादा भाव खाणार हे निश्‍चीत होते, त्यातच पुणे जिल्ह्यात पिकणारा गोटी आंबाही यंदा कमी प्रमाणातच बाजारात येणार असल्याचे व्यापारी सांगत असतानाच  गेल्या दोन-चार दिवसांत पावसाने हजेरी लावली. मोहराच्या काळातही पडून गेलेल्या पावसामुळे आंबा उत्पादकांना फवारणी करावी लागली, तर आता आंबा पिकत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने फळं गळून पडली. त्यामुळे यंदा आंब्यानेही शेतकऱ्याचे आर्थिक गणित फिरवले आहे. 

पुण्याच्या बाजारपेठेत कर्नाटक आणि रत्नागिरीतून येणाऱ्या आंब्यांची आवकही आताही म्हणावी तशी वाढलेली नाही. रत्नागिरीतही प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात काहीशी घट आली आहे. पुणे जिल्ह्यातही आंब्याचे उत्पादन होते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील बाजारात तर हापूस पेक्षा गोटी आंब्यांलाच अधिक मागणी असते. परंतु, हा आंबा तयार होत असतानाच गेल्या दोन-चार दिवसांत आलेल्या पावसामुळे फळ गळून पडली आहेत. सध्या, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयार सुरू केली आहे. गहू, ज्वारी, कांदा अशी नगदी पीकं काढून झाली असून रानं तापायला ठेवली आहेत, अशातच झालेल्या पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे फळं तुटून पडल्याने यंदा व्यावसायिकरित्या आमराई लावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. बारामती, इंदापूर आणि भोर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात आंबा निघतो. यंदा, मात्र सुरवातीपासूनच मोहर कमी होता, त्यातच फळं मोठी होत असतानाच पावसाने ती तुटून पडली. यामुळे यंदा आंबा पिकानुसार आखलेले आर्थिक गणित कोलमडणार आहे.

बांधावर आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा आंब्यापासून उत्पन्न कमी मिळण्याचीच चिन्हे आहेत. मोहर लागण्याच्या काळातही अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे मोहरावर मावा, चिकटा रोग पडला होता. या रोगामुळे 10 ते 15 टक्के मोहर कमी झाला होता. साधारणपणे एका झाडाला 700 ते 800 कैऱ्या लागतात. परंतु, रोगामुळे याचे प्रमाण 450 ते 500 पर्यंत आले होते. त्यातच गेल्या दोन-चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे फळगळती झाले आहे. आंबा यंदाही भाव खाणार हे निश्चित. पुणे जिल्ह्यातील बाजारपेठेत कर्नाटकातून आंब्यांची आवक होवू लागली आहे. परंतु, रत्नागिरी नंतर जिल्ह्यातील गोटी आणि हापूस आंब्यांची गोडी या आंब्यांना नसते. पुणे जिल्ह्यात तयार होणारा गोटी आंब्याचे उत्पादनही घटणार असल्याने आपला हा गावरान आंबाही यंदा महागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)