आंबडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा जखमी

प्रातिनिधिक छायाचित्र

आजींच्या लेक-सुनेची बिबट्यावर दगडफेक
अकोले – तालुक्‍यातील आंबड येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी घडली.

आंबड -पाडाळणे रोडवर मुक्‍ताईची वाडी परिसरात बाळू काशिनाथ नवले यांची वस्ती आहे. घराशेजारी गोठा आहे. गोठ्यात वासरे आणि कोंबड्या असल्याने या परिसरात बिबट्याचा संचार यापूर्वीही आढळला आहे. सोमवारी रात्री बिबट्या गोठ्याजवळ आला. बिबट्याने एका मांजराचा पाठलाग केला. या पाठलागावेळी बिबट्या शौचालयात घुसला. बिबट्याच्या धक्‍क्‍यामुळे शौचालयाचा दरवाजा बंद झाला. बिबट्या रात्रभर शौचालयात अडकून पडला. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास 70 वर्षीय गंगुबाई काशिनाथ नवले शौचालयाकडे गेल्या. शौचालयाचा बंद दरवाजा उघडण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या. परंतु, तो दरवाजा काही केल्या उघडेना. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी दरवाजा ढकलला.

दरवाजा उघडताच चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये गंगुबाईंची मान, डोक्‍याला तोंडात धरत पंजांच्या साहाय्याने बिबट्याने त्यांना जखमी केले. गंगुबाई यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा मुलगा आणि सुनेने धाव घेत काठी आणि दगडांच्या साहाय्याने बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. दगडांचा मारा झाल्याने बिबट्याने डरकाळ्या फोडत पळ काढला.
घटना समजताच सरपंच रोहिदास जाधव, सुरेश भोर, अनिल हासे, दत्तू जाधव, मारुती भुतांबरे, प्रदीप हासे, शिवाजी जाधव, सुनील नवले, बाळू नवले, सोमनाथ कातोरे, सुनील कातोरे, लक्ष्मण कानवडे, संतु गावंडे, बाळासाहेब कातोरे आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी आजींना प्राथमिक उपचारासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तेथे लस उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात गंगुबाई यांना पाठविण्यात आले. वनक्षेत्रपाल जयश्री पोले, वनपाल शेंडगे, कर्मचारी घोडसरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)