काश्‍मीर, हिमाचल प्रदेश येथून आवक

पुणे – आंबट-गोड चवीची चेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा चेरीचा हंगाम सुरू झाला आहे. जम्मू काश्‍मीर येथून विमानाने, तर हिमाचल प्रदेश येथून रेल्वेने चेरीची आवक होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक आठवडा आधीच चेरीची आवक झाली आहे. शुक्रवारी बाजारात एक ते दीड हजार बॉक्‍सची आवक मार्केट यार्डातील फळ बाजारात आली. काश्‍मिरातील चेरी उत्पादक जिल्ह्यामध्ये हवामान खराब असल्याने आवक कमी होत आहे. त्यामुळे चेरीला भाव जास्त मिळत आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार प्रती किलोला 200 ते 350 रुपये मोजावे लागत आहेत.
याविषयी नजीर बागवान (दौंडकर) म्हणाले, सध्या काश्‍मीर परिसरातील चेरी उत्पादक जिल्ह्यांमध्ये वातावरण खराब असल्याने बाजारात चेरीची आवक घटली आहे. त्यामुळे, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 ते 100 रुपयांनी अधिक निघाले आहेत. पुढील काही दिवसांत चेरीची वाढेल. त्यावेळी भाव कमी होतील. सध्या सुरू झालेला चेरीचा हंगाम जुलै महिन्यापर्यंत चालेल. बाजारात गृहिणी, किरकोळ विक्रेत्यांकडून चेरीला मागणी आहे.
व्यापारी अण्णा झेंडे म्हणाले, यावर्षी चेरीचा हंगाम लवकर सुरू झाला आहे. काश्‍मीर येथील श्रीनगर, सोपियान, कुलवामा तसेच सिमला येथून चेरीची आवक होत आहे. येथील घाऊक बाजारात त्याच्या दर्जानुसार प्रतिकिलोस 200 ते 350 रुपये भाव मिळत आहे. बाजारात काश्‍मीर भागातील चेरीची विमानाने तर सिमला भागातील चेरीची रेल्वेने शहरात दाखल होत आहे. मखमली आणि मिशरी या दोन जातीच्या विक्रीसाठी आल्या असून या फळांना चांगली मागणी आहे. मिशरी चेरी ही रंगाने मरून तर चवीला गोड असून ती साधारण भरपूर दिवस टिकते. तर, चवीला आंबट-गोड असलेली मखमली दोन दिवस टिकत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना हिमाचल प्रदेश, सिमला येथील शेतकरी विमल चंदीगढ म्हणाले, यंदा हिवाळ्यात बर्फवृष्टी कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे, त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. चेरीसाठी 8 ते 12 तास चिलींग होणे आवश्‍यक आहे. मात्र, ते झाले नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे, यंदा चेरीच्या भावात तेजी राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)