आंदोलन संयमाने आणि अहिंसक मार्गाने करा – पोलीस अधीक्षक संदीप पाटील

लोणावळा – आंदोलन निश्‍चित करा, पण संयमाने आणि अहिंसक मार्गाने करा आंदोलन हिंसक झाले ते बदनाम होते आणि त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. गुन्हे दाखल झाल्यावर त्याचे दुष्परिणाम वैयक्‍तिक भोगावे लागतात. गुन्हे मागे घेतले जातातही पण तोपर्यंत अनेक वर्षे निघून गेलेले असतात. मराठा पेटतो पण तो बुद्धीने पेटला पाहिजे. बुद्धीचातुर्याने लढाई जिंका असा सल्ला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लोणावळ्यात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मावळ तालुका कार्यकर्त्यांसोबत बोलताना उपस्थितांना दिला.

नऊ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा शहरात मराठा क्रांती मोर्चा, मावळ तालुका कार्यकर्ते आणि पोलीस दल यांच्यात एक बैठक सोमवारी पार पडली. यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना संदीप पाटील हे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध लढली. पण ही युद्ध लढत असताना कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊन दिली नाही, किंवा जनतेला त्रास होईल, असे काहीही होऊन दिले नाही. त्यासाठी प्रसंगी पुरंदर सारखा तह देखील केला. त्यामुळे आपले आंदोलन चालू असताना आपल्या शहराला किंवा आपल्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागेल, असे काही होऊ देऊ नका असे प्रतिपादन त्यांनी केले.

कोणतेही आंदोलन असो ते हिंसक होऊ देऊ नका. अनेकदा या आंदोलनाचा दुरुपयोग काही समाजकंटक घेतात आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावा लागतो. 15 ते 25 वयोगटातील मुलांना हे समजून सांगितले पाहिजे, असेही पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले. शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले तर गुन्हे दाखल होतात आणि कोणीही कितीही काहीही बोलले तरी ते मागे घेतले जात नाही. जोपर्यंत सर्व व्यवस्थित आणि शांततेने सुरू आहे, तोवर पोलीस कोणावरही गुन्हे दाखल करणार नाही, असे आश्‍वसन दिले.

सकल मराठा क्रांती मोर्चा, मावळ तालुक्‍याच्या वतीने यावेळी चाकण बंदच्या वेळी झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करतानाच मावळ तालुक्‍यातील बंद हा शांततेतच होईल, असे आश्‍वासन दिले. मात्र त्याचवेळी 9 ऑगस्ट रोजी शाळा, महाविद्यालय, कारखाने बंद कसे राहतील, या दृष्टीने प्रयत्न करावे. यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय व्हावा अशी मागणी देखील केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)