आंदोलनास काही ठिकाणी हिंसक वळण

जिल्ह्यात वाहने जाळण्याचे, दगडफेकीचे प्रकार; तोडफोडही
जागोजागी जाळले टायर; जागर गोंधळ अन्‌ कीर्तनातून निषेध

नगर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नगर शहरात औद्योगिक वसाहतीमधील पाच कंपन्यावर दगडफेक, पाथर्डीमध्ये पोलीस व अग्निशामक बंबावर झालेली दगडफेक, नगरमध्ये एका वाहनाला लावलेली आग, काही ठिकाणी केलेली तोडफोड, तर पाथर्डी, राहाता, कर्जत, नगर या ठिकाणी टायरची जाळपोळ वगळता बंद शांततेत पार पडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात ठिकठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिय्या, “रास्ता रोको’ करून चक्‍काजाम करण्यात आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. या बंदमुळे सर्वंच रस्त्यांवर सन्नाटा पसरला होता. व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवल्याने शहरांमध्ये शुकशुकाट दिसत होता.

सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हाभरात आंदोलन सुरू झाले. नगर शहरातील केडगाव उपनगरातील भूषणनगर चौकात चौपदरी रस्त्यावर टायर जाळण्यात आले. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले. दुपारी काही कार्यकर्त्यांनी काढलेली मोटारसायकल रॅली औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्यानंतर तेथे काही कंपन्या उघड्या असल्याचे आढळून आले. त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झाले.

इंडियन सिमलेस, सनफार्मा, क्रॉम्प्टन, एक्‍साईड कंपनीवर दगडफेक करण्यात आली. याशिवाय क्‍लासिक व्हिल, आयएसएमटी, सुदर्शन डेअरी या कंपनीवर दगडफेक केली. यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच नेप्ती चौकात चारचाकी वाहन पेटवून देण्यात आले. अर्थात हे वाहन बऱ्याच दिवसांपासून तेथे पडून होते. प्रोफेसर कॉलनी चौकातील एका कॅफेवर दगडफेक करण्यात आली.

पाथर्डी शहराजवळील तनपुरवाडी येथे टायर जाळण्यात आले. जळत असलेले टायर विझविण्यासाठी आलेल्या अग्नीशमक दलाच्या गाडीसह पोलीसांच्या वाहनांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तालुक्‍यातील कोरडगाव, साकेगाव, डांगेवाडी, तनपुरवाडी येथे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर लाकडाचे ओंडके आडवे टाकून रस्ता बंद करण्यात आला. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले. संगमनेर शहरात मोठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

जामखेड तालुक्‍यातील जवळे येथे 200 कार्यकर्त्यांनी मुंडण केले, तर जामखेड शहरातून बैलगाडीची फेरी काढण्यात आली. कर्जत तालुक्‍यातील रेहेकुरी व रुईगव्हाण येथे टायर जाळण्यात आले. नेवासे तालुक्‍यातील तरवडी गावात आंदोलनावरून दोन गटांत मारामारीची घटना घडली. अकोले तालुक्‍यात कोल्हार-घोटी रस्त्यावर टायर जाळण्यात आले. या किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आलेल्या चक्‍काजाम आंदोलनात जागरण गोंधळ, भजन, कीर्तन, पोवाडे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी ठिय्या व “रास्ता रोको’ करून रस्ते बंद करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. प्रमुख रस्त्यांवर वाहने दिसत नसल्याने अक्षरशः सन्नाटा पसरला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)