आंदोलनात मालमत्तेचे नुकसान टाळा

पुणे- मराठा आरक्षण प्रश्‍नी आत्महत्या करण्याचे प्रकार दुर्दैवी आहेत. मृत्यूमुळे होणारे नुकसान कोणीही भरुन काढू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीबाबत प्रशासन सकारात्मक असून आंदोलन शांततेने करावे. खासगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी केले.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी (दि.9) आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब अमराळे, राहूल पोकळे, विराज तावरे, रघुनाथ चित्रे, तुषार काकडे, युवराज दिसले, हर्षल लोहकरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी संबंधितांच्या भावना जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी राम म्हणाले की, सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले होते, तथापि त्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या स्थगितीविरुध्द सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, तेथे रिलीफ मिळाला नाही. उच्च न्यायालयाने या संदर्भात मागासवर्ग आयोगाची स्थापना करुन त्यांच्यामार्फत अहवाल सादर करण्याची भूमिका मांडली. शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली असून सध्या न्यायमुर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाचे कामकाज सुरु आहे. मराठा आरक्षणाबाबतची सर्व वैधानिक प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत 72 हजार जागांच्या मेगा भरतीलाही स्थगिती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्‍वासन दिले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून देशात ओळखले जाते. राज्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होण्यामध्ये मराठा समाजाचे मोठे योगदान आहे. राज्यातील सर्वधर्मसमभाव, शांतता, एकोपा कायम ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामीण तसेच मध्यमवर्गीय समाजातील परिस्थितीची मला जाणीव असून, या तरुणांच्या भावनांकडे दुर्लक्ष करु शकत नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

  • कायदा व सुव्यवस्था राखा – पाटील
    जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे, ही सर्वांसाठी आवश्‍यक बाब आहे. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने यापूर्वी काढलेले 58 मोर्चे हे शांततेच्या मार्गाने आणि शिस्तबध्द होते, याचे संपूर्ण जगात कौतुक झाले. तरुणांनी चुकीच्या पध्दतीने आंदोलन करु नये, निरपराध तरुणांना कोणताही त्रास होणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)