आंतरराष्ट्रीय समूहात चिंतेचे वातावरण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा इतिहास पाहता निवडणुकीत केलेली वक्तव्ये आणि प्रत्यक्ष पदभार स्वीकारल्यावर घेतलेले निर्णय यांमध्ये तफावत आढळून येते. मात्र नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प हे मात्र ही परंपरा खोटी ठरवत आहेत. राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून काही अत्यंत वादग्रस्त, अशक्‍य अशा गोष्टीही ते प्रत्यक्षात आणताना दिसत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समूहात चिंतेचे वातावरण पसरले आहे. इराणने केलेल्या बॅलेस्टिक मिसाईल चाचणीनंतर ट्रम्प यांनी या देशावर आर्थिक निर्बंध टाकण्याच्या आणि लष्करी कारवाई करण्याच्या चालवलेल्या विचारामुळे संपूर्ण पश्‍चिम आशियावर परिणाम होणार आहे. एका नव्या संघर्षाच्या दिशेने जग जाते की काय, अशी भीती यामुळे निर्माण झाली आहे.

अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी हाती घेतल्यापासून जगभरात एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. ट्रम्प यांनी गेल्या महिन्याभराच्या काळात अत्यंत वादग्रस्त आणि तडकाफडकी निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. वास्तविक, ते अशा स्वरूपाचे निर्णय घेतील याची चुणूक त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या प्रचाराच्या भाषणांतून दिसली होती. त्यांनी केलेली प्रक्षोभक वक्तव्ये ऐकूनच ही व्यक्‍ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर काय होईल अशी भीती निर्माण झाली होती. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा इतिहास पाहता निवडणुकीत केलेली वक्तव्य आणि प्रत्यक्ष पदभार स्वीकारल्यावर घेतलेले निर्णय यामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे अनेकांना ट्रम्प यांच्या निवडणूकपूर्व काळातील घोषणा, वक्‍तव्ये हे सर्व स्टंटबाजी आहे, असे वाटत होते. मात्र ट्रम्प यांनी आजवरचा इतिहास खोटा ठरवणत अशक्‍यप्राय वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय समूहात चिंतेचे वातावरण पसरले आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणात लक्षणीय बदल होणार की काय अशी शक्‍यता वजा भीती वाटण्याजोगी सध्याची परिस्थिती आहे.
इराणवर निर्बंध
काही दिवसांपूर्वी त्यांनी सात मुस्लीमबहुल देशांबाबत काही कडक धोरणे अवलंबिली आहेत. या देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. या सात राष्ट्रांमध्ये इराणचाही समावेश होता. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे अरब जगतामध्ये अमेरिकेविषयी असणारा असंतोष आणखी वाढला आहे. त्यातच इराणने अलीकडेच एका क्षेपणास्त्राची (बॅलास्टिक मिसाईल) चाचणी केली आहे. या चाचणीचा डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिशेल क्‍लीन यांनी कडाडून विरोध केला आहे. त्याचबरोबर त्यांनी इराणला एक कडक इशाराही दिला आहे. इराणविरोधात अमेरिका कोणत्याही पद्धतीचे पाऊल उचलू शकते, असा एक प्रकारे सज्जड दम त्यांनी भरला आहे. अमेरिका दोन प्रकारे इराणाची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक म्हणजे ओबामांच्या काळात शिथील करण्यात आलेले आर्थिक पुन्हा घालून ते अधिक कडक करण्याचा ट्रम्प शासनाचा विचार आहे. त्याचबरोबर इराणविरोधात लष्करी पाऊलही उचलले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे, त्यामुळे संपूर्ण पश्‍चिम आशियामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. कोणत्याही क्षणा अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये लष्करी संघर्ष सुरु होऊ शकतो, असे आंतरराष्ट्रीय जाणकारांचे म्हणणे आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील बेबनाव
अमेरिकेकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्यामुळे इराणने एक पाऊल मागे न जाता उलटपक्षी इराणमधील कट्टरवादी गटांनी तेथील शासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. इराणने आता अण्वस्त्रांचे परीक्षण रून अमेरिकेला उघड आव्हान द्यावे, असा या गटाचा दबाव आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील बेबनाव टोकाला पोहोचला आहे. त्याची परिणती कोणत्याही क्षणी लष्करी कारवाईत होऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पश्‍चिम आशिया आणि आखाती राष्ट्रे यांच्यावर विपरीत परिणाम होतील. मुख्य म्हणजे या संघर्षाचा सर्वांत मोठा फटका तेलव्यापारावर परिणाम होणार आहे. कारण हा संपूर्ण प्रदेश कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूंचे आगर आहे. जगभरातील बहुतांश देशांची तेलाची गरज या राष्ट्रांमधून पूर्ण केली जाते. त्यामुळे पश्‍चिम आशियात अस्थिरता, अशांतता निर्माण झाल्यास त्याची किंमत संपूर्ण जगाला चुकवावी लागणार आहे.
इराणला बाजूला टाका
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नजीकच्या काळात भडकण्याच्या दाट शक्‍यता आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रम्प यांचे अरब राष्ट्रांविषयीचे धोरण. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात सामावून घेतलेल्या व्यक्‍तींची भूमिका ही इस्लामिक दहशतवादाला विरोधाची आहे. विशेष करून ते इराणविरोधी आहे. अमेरिकेच्या सरकारमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद अमेरिकेच्या राजकारणात महत्त्वाची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या पदावर मिशेल फ्लीन यांची नेमणूक केलेली आहे. या फ्लीन यांनी “द फिल्ड ऑफ फाईट ः हाऊ कॅन वी विन द ग्लोबल वॉर अगेन्स्ट रॅडिकल इस्लाम अँड इटस अलायन्स’ हे अत्यंत गाजलेले पुस्तक आहे. संपूर्ण जगात इस्लामिक मूलतत्त्ववादाचा प्रसार करण्यात इराणची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे इराणला बाजूला टाका, निर्बंध टाका असा विचार फ्लीन मांडत आहेत. अशा विचारांची व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी असल्यामुळे अमेरिकेचे इराणबरोबरचे संबंध अत्यंत तणावपूर्ण बनणार आहेत.
ओबामांच्या धोरणाविरोधी ट्रम्प यांचे धोरण
ट्रम्प यांचे इराणविषयीचे धोरण माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या धोरणांच्या पूर्णपणे विरोधात आहे. बराक ओबामा यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कालखंडामध्ये इराणसंदर्भात मवाळ भूमिका घेतली होती. त्यामागचे कारणही तसेच होते. इराणने अण्वस्त्रप्रसार बंदी कायद्यावर स्वाक्षरी केली होती. मात्र तरीही इराणने छुप्या पद्धतीने अण्वस्त्रांचा विकास करायला सुरुवात केली, त्यामुळे अमेरिका आणि पाश्‍चिमात्य जगाने इराणवर त्यांनी आर्थिक निर्बंध घालायला सुरुवात केली; मात्र त्याचा परिणाम इराणवर होताना दिसून आला नाही. इराण आपल्या अणुकार्यक्रमापासून मागे हटायला तयार नव्हता. त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढायला लागली. अफगाणिस्तान आणि इराण यांच्यासंदर्भात अमेरिकेची धोऱणे सपशेल अपयशी ठरल्यामुळे ओबामांनी थोडी वेगळी वाट निवडून वेगळे प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिका-इराण संबंध ताणले
वास्तविक शांततेचा नोबेल पारितोषिक बराक ओबामांना दिला होता. त्यांच्या अण्वस्त्रप्रसार बंदीतील कार्य आणि शांततेचे प्रयत्न गृहित धरूनच हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे हा पुरस्कार सार्थकी लावण्यासाठी आणि अफगाणिस्तान, इराण यामधील अपयशावर तोडगा काढण्यासाठी काही ठोस प्रयत्न करावे लागणार होतेच, त्यासाठी त्यांनी नमते धोरण घेत अमेरिका-इराण यांच्यामध्ये एक ऐतिहासिक अणुकरार घडवून आणला. या करारानुसार इराणवरील आर्थिक निर्बंध काढले जातील आणि जवळपास 6 अब्ज डॉलरची मदत इराणला दिली जाईल, असे ठरवण्यात आले. त्याचबरोबर या करारान्वये इराण अण्वस्त्रांचे परीक्षण करणार नाही, आपला अणुकार्यक्रम थांबवेल असे निर्धारित करण्यात आले. अमेरिका आणि इराण यांच्यातील हा अणूकरार अत्यंत यशस्वी ठरला होता. दोन्ही राष्ट्रांतील संबंध सुरळीत होण्यास या कराराची मदत झाली. ओबामांच्या कार्यकाळातील अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणून या ऐतिहासिक कराराकडे पाहिले गेले. मात्र ट्रम्प यांनी याविरोधात आपली धोरणे राबवली आहेत. त्यांनी हा अणुकरार मोडून इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादू आणि वेळ पडल्यास लष्करी कारवाई करू असे म्हणण्यास सुुरवात केली आहे, त्यामुळे पुन्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.
ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला?
आता प्रश्‍न असा उरतो की ट्रम्प यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला आहे, याचे एक कारण इस्लामिक दहशतवादाला असलेला विरोध हे आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ओबामांनी इराणबरोबर सुधारल्यानंतर अमेरिकेचे पश्‍चिम आशियातील इस्रायलसारखी इतर मित्र राष्ट्रे खूप दुखावली गेली होती, तसेच इराण हा शियाबहुल देश असल्यामुळे इतर सुन्नी मुसलमान देशही अमेरिकेच्या या निर्णयामुळे दुखावले गेले होते. कारण हे सर्व देश इराणच्या विरोधात होते. ओबामांनाही याची कल्पना होती. मात्र तरीही त्यांनी आखातातील पारंपरिक धोरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला होता. शीतयुद्धकालीन धोरणानुसार सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन या सुन्नी मुसलमान देशांची अमेरिका पाठराखण करत होते आणि इराणच्या विरोधात भूमिका घेत होते; पण ओबामांनी ही परपंरा मोडीत काढत इराणला जवळ केल्यामुळे ही सर्व राष्ट्रे नाराज होती. आता ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे इस्रायल आणि इतर अरब देश यांच्यामध्ये आनंदाची लाट पसरते आहे. इराणवर निर्बंधांचे पाऊल आणण्याचा इशारा देऊन ट्रम्प यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एका बाजूला त्यांनी इस्रायल आणि इतर अरब राष्ट्रांचा विश्‍वास परत मिळवला आहे आणि दुसरीकडे इराणच्या युद्धखोरीलाही इशारा दिला आहे.
भारताला मध्यस्थी करावी लागेल
मुख्य म्हणजे अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध घातल्यास त्याचा परिणाम निश्‍चितपणे भारतावरही होणार आहे. कारण भारत इराणकडून तेलाची सर्वाधिक आयात करतो. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले तर भारतालाही त्यामध्ये सामील होण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यामुळे भारताला इराणकडून करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाची आयात कमी करावी लागणार आहे. इराणसोबत ओबामांनी केलेला अणुकरार भारतासाठी स्वागतार्ह होता. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही देशांशी भारत यांचे संबंध चांगले आहेत. मात्र आता ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारताची राजनैतिक कोंडी होण्याची आणि आर्थिक नुकसानही होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुरळीत रहाण्यासाठी भारताला प्रयत्नशील राहावे लागेल.

-डॉ. शैलेंद्र देवळाणकर,
परराष्ट्र धोरण विश्‍लेषक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)