आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्यासाठी नागपूर हे उत्तम ठीकाण – मुख्यमंत्री

नागपूर -राज्यातील नागपूर शहराचे भौगोलिक स्थान लक्षात घेता आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्यासाठी नागपूर हे उत्तम ठीकाण आहे. मेडिकल टुरिझमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी यासंदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत करार केला होता. त्याअंतर्गत देशात 11 मेडिसीटी स्थापन होणार आहेत. यातील पहिल्या मेडिसिटीच्या स्थापनेचा मान नागपुरला मिळाला आहे. येणाऱ्या काळात शहरात मेडिकल टुरिझम ही वाढीस लागेल असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशातील पहिल्या इंडो-युके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडिसिटीच्या कोनशीलेचे रविवारी अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. आशीष देशमुख, आ. प्रकाश गजभिये, महापौर नंदा जिचकार, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, इंडो-युके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय राजन गुप्ता, ब्रिटीश उच्चायुक्तामधील व्यापार, वित्त विभागाच्या उपसंचालिका जेन ग्रेडी, ईआन वॉटसन, मार्क हिचमॅन प्रामुख्याने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, 20 वर्षांपूर्वी मिहानचा आराखडा तयार झाला तेव्हा मेडिकल टुरिझमसाठी विशेष क्षेत्र राखीव ठेवण्यात आले होते. मात्र हा प्रकल्प लांबला. सत्ताबदलानंतर मिहानच्या विकासाने वेग घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी तर यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. हे एक इस्पितळ राहणार नसून मेडिसिटी आहे. त्यामुळे यातून निश्‍चितच मिहानचा कायापालट होणार असल्याचे ते म्हणाले. 2019 पर्यंत मेडिसिटीचा पहिला टप्पा पूर्ण होईल अशी माहितीही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)