आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश पाकसाठी बंधनकारक – भारत

नवी दिल्ली – कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला आदेश अगदी स्पष्ट स्वरूपाचा आहे. तो आदेश पाकिस्तानसाठी बंधनकारक आहे, असे भारताने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे भारताच्या जनतेला मोठाच दिलासा मिळाला आहे. जाधव यांना न्याय मिळण्याची निश्‍चिती होण्याच्या दृष्टीने हा निकाल म्हणजे पहिले पाऊल आहे. जाधव यांच्या जीविताच्या रक्षणासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे भारताच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले. तर पाकिस्तानच्या बनावट भूमिकेला हादरा बसला. भारताची भूमिका सत्यावर आणि मानव हक्कांच्या आदरावर आधारित असल्याने न्यायालयाचा अंतरिम निकाल म्हणजे मोठे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी दिली. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकील हरीष साळवे यांची प्रशंसा केली. पहिली फेरी जिंकूून देताना त्यांनी भारताची शान उंचावली, असे म्हणत त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे जबाबदार देशासारखी वर्तणूक करण्यास पाकिस्तानला भाग पडेल. जाधव यांना वकिलातीची मदत उपलब्ध करण्याची संधी भारताला मिळू शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)