आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची पायाभरणी बोपर्डी शाळेतून

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आतंरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थी करणार परदेशातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा

वाई – महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य असून राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानांकने प्राप्त करणाऱ्या असाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्यात 13 शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड केली आहे. शाळेत उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधा, शाळेचे नेतृत्व, शिक्षकांची गुणवत्ता, शाळेचे ध्येय, प्रशासकीय मदत आणि लोकसहभाग या निकषावर या शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक केंद्र शाळा बोपर्डी, ता. वाई या शाळेची निवड शासनाकडून करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निवड झालेल्या शाळामध्ये महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवला जातो. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली आहे. या शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम थिमबेस (विषयसुत्र) असून एकात्म पध्दतीने विदयार्थ्यांना शिकविले जाते. शिक्षणाचे माध्यम मराठी म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. बहुविध बुध्दीमत्तेला चालना, कृतीशील अध्ययन अध्यापन कृती, सर्जनशीलतेचा विचारक्षमतेला वाव, ज्ञानरचनावादावर आधारीत कृती व आशय व इयत्ता 1 ली पासूनच इंग्रजी व संस्कृत विषयाचा सामावेश ही या अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी घडविताना विद्यार्थ्यांचा कस लागणार असून त्याबरोबर शिक्षकांसह पालकांचाही कसोटी लागणार आहे. शाळेतील शिक्षकांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचे उन्हाळी सुट्टीत 21 व दिपावली सुट्टीत 10 दिवसाचे प्रशिक्षण दिले गेले होते. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून अंगणवाडी शिशू गट ते मोठा गट इयत्ता पहिली ते तिसरीच्या वर्गाला नवीन अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरू झाले आहे.

सदर आंतराष्ट्रीय शाळा भौतिक सुविधा, क्रीडाविषयक व विज्ञान विषयक सर्व सुविधायुक्त होण्यासाठी ज्ञानगंगा शिक्षणसंस्था बोपर्डीचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी त्यांच्या संस्थेची पावणे दोन एकर जागा देण्याची घोषणा शाळेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा बोपर्डी नामकरण सोहळ्यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत केली.

या नवीन जागेमध्ये भव्य इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रिडांगण, संगणक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुनील मगर, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, पुर्व शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, वाई गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे विस्तार अधिकारी विष्णू मेमाणे, केंद्रप्रमुख एम. एच. तडवी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली शाळेचे मार्गक्रमण चालू आहे.

तसेच मुख्याध्यापक संभाजी जाधव, शिक्षक उध्दव निकम, सचिन पवार, सुरेश यादव, उज्वला महामुनी, यास्मिन मोकाशी, वर्षा फरांदे, सविता मोरे, शंकर सुर्यवंशी अंगणवाडी सेविका मुक्ता नलावडे, संगीता गाढवे, श्‍वेता घोरपडे, सुरेखा शिवणकर यांना प्रशिक्षण मिळाले असून या प्रकल्पाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गिरीश गाढवे व सर्व सदस्य, ग्रामस्थ प्रयत्नशील असून सहकार्य करीत आहेत.

सातारा जिल्ह्यातील बोपर्डी ही पहिली आंतरराष्ट्रीय शाळा आहे. थिमबेस शिक्षण पध्दतीचा आवलंब केला असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, श्रृजनशीलतेला वाव मिळत असून आधुनिक शिक्षणपद्धतीने प्राथमिक शिक्षणात क्रांती होणार आहे. अंगणवाडी ते बारावीपर्यंत शिक्षण दिले जाणार आहे. फिनलॅण्ड, हॉंगकॉंग, सिंगापूर या देशातील मुलांशी या मुलांची स्पर्धा होणार आहे. 2021 मध्ये पीसा (प्रॉग्राम फोर इंटरनॅशनल स्टुडंट अशेसमंट) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिक्षेला मुले भाग घेणार आहेत. वाई तालुक्‍यातील 10 शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा दर्जासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.
कमलाकांत म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी
– वाई पंचायत समिती.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम इयत्ता 1ली ते 3री च्या विदयार्थ्यांना लागू झाला असून थीम बेस लर्निंगमुळे विदयार्थ्यांमध्ये सृजनशिलता, कल्पनाशक्ती, प्रश्‍ननिर्मिती कौशल्य, इंग्रजी व संस्कृतवर प्रभुत्व, परस्पर सहकार्य इ. कौशल्यांचा विकास होत आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना विषेश आनंद आणि समाधान मिळत आहे.
सचिन पवार,
उपशिक्षक – बोपर्डी

 

आता नवीन अभ्यासक्रमामुळे आम्हाला वेगवेगळ्या कृती करायला मिळतात. प्रत्यक्ष भेटी, प्रयोगचर्चा यामुळे आम्हाला नवनवीन गोष्टी समजतात. आमची शाळा आंतरराष्ट्रीय शाळा झाल्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो व आम्हाला खुप आनंद होत आहे.
अंजली शिंदे, विद्यार्थी
– जि. प. प्राथमिक शाळा, बोपर्डी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)