आंतरजातीय विवाह दाम्पत्यांना “अर्थसहाय्य’चा हातभार

2017-18 या वर्षात 297 दाम्पत्यांना लाभ : 2018-19 वर्षात आतापर्यंत 95 अर्ज प्राप्त

पुणे, दि. 25 – आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ अनेक दाम्पत्यांना मिळत आहे. त्यामुळे समाज एकत्र होत आहे. तसेच दाम्पत्यांच्या संसाराला या अर्थसहाय्यामुळे काहीसा हातभर मिळत आहे. 2017-18 या वर्षात पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील 297 दाम्पत्यांना या योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात आले आहे, अशी माहिती सामाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

समाजामध्ये समतेची भावन रुजावी, त्यांच्यात एकात्मता दृढ व्हावी, जातीपातीचे समूळ निमृलन व्हावे यासाठी राज्य शासनाने “आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देणे’ ही योजना सुरू केली. त्यामध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना 50 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. राज्यात अनेक जाती-पाती आहेत. प्रत्येक जातीच्या रूढी, परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे लग्न करायचे तर आपल्याच जातीमध्ये अशा पायंडा सर्व समाजाने पाडून घेतल्याचे पहायला मिळते. परंतु, सध्या हा पायंडा मोडीत निघाला असून, जात-पात न पाहाता लग्न करणारे काही तरूण-तरूणी पुढे आले आहेत. त्यामध्ये या दाम्पत्यांना समाजाकडून त्रासही सहन करावा लागत आहे.

मात्र, या आंतरजातीय विवाहास राज्य शासनानेच प्रोत्साहन देत या दाम्पत्यांना अर्थसहाय्य देण्याची तयारी दर्शवली. जात-पात, धर्म न पाळता सगळा समाज एक आहे. सर्वांनी एकसंघ राहावे हा संदेश देण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. 1 फेब्रुवारी 2010 नंतर लग्न झालेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी वराचे वय 21 वर्षे पूर्णतर वधुचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक आहे. वर आणि वधू हे दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असावे तर ज्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ही योजना राबविली जाते त्या जिल्ह्यातील वर असावा. त्यामध्ये वर आणि वधू यांपैकी एकजण हिंदू सवर्ण आणि दुसरी व्यक्ती हिंदू मगासवर्गीय प्रवर्गातील (एस.सी., एस.टी., वी.जे.एन.टी., एस.बी.सी) असावी. आंतरप्रवर्गातील विवाहीतांनाही सदर योजना लागू आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे
विवाह नोंदणी दाखला
वर आणि वधू यांचा शाळा सोडलेला दाखला
वर आणि वधून महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा जिल्हाधिकारी यांचा दाखला
वर आणि वधू यांच्यापैकी हे मागासवर्गीय असतील त्यांचा जातीचा दाखला
दोघांचे संयुक्त बॅंक खाते असलेल्या पासबुकची झेरॉक्‍स प्रत
वर आणि वधु यांचा एकत्र फोटो

लाभार्थ्यांची संख्या वाढतेय
“आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देणे’ या राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजनेला मागील काही वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाज कल्याण विभागामार्फत दाम्पत्यांना हे अर्थसहाय्य दिले जाते. 2016-17 या आर्थिक वर्षात पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 225 दाम्पत्यांना तर 2017-18 या वर्षात 297 दाम्पत्यांना अर्थसहाय्य देण्यात आले. तर 2018-19 या वर्षात आतापर्यंत 95 दाम्पत्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे आले असून, त्याची छाणनी होवून दाम्पत्यांना अर्थसहाय्य देण्यात येईल. दरवर्षी अर्थसहाय्य घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)