आंतरजातीय विवाह करणाऱ्या कुटुंबांना वाळीत टाकले

तेलगू मडेलवार परीट समाजातील पंचाविरोधात तक्रार

पुणे – तेलगू मडेलवार परीट समाजातील युवकांनी आंतरजातीय लग्न केल्याचा कारणावरून अनेक कुटुंबाना समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला. याप्रकरणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मदतीने तेलगू मडेलवार परीट समाजातील बहिष्कृत केलेल्यापैकी 15 कुटूंबांनी कोंढवा पोलीस ठाण्यात जातीतील पंचाविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्यात दि. 3 जुलैपासून जात पंचायत विरोधी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. कायदा नवीन असल्यामुळे कोंढवा पोलीस कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेत आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल झाला तर राज्यात या कायद्यानुसार दाखल होणारा हा पहिलाच गुन्हा असेल अशी माहिती अंधश्रघ्दा निमूर्लन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी दिली.

दरम्यान कोंढवा पोलिसांनी बहिष्कृत कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. वाळीत टाकणाऱ्या पंचाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कोंढवा परिसरात तेलगू मडेलवार परीट समाजाचे अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. यातील काही युवकांनी दुसऱ्या जातीतील तरुणींसोबत विवाह केल्याच्या कारणावरून या समाजातील पंचांनी तरुणांच्या कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत केले आहे. बहिष्कृत कुटुंबीयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात तेलगु मडेलवार समाज फंड या नावाची संस्था आहे. या संस्थेचे पदाधिकारी वाळीत टाकलेल्या कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नास उपस्थित राहत नाहीत तसेच बहिष्कृत केलेल्या कुटुंबियांना लग्न, विविध समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार कार्यक्रम आदीमध्ये निमंत्रित केले जात नाही. पंचाकडून आंतरजातीय लग्न करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींची सोयरिक समाजात जुळू नये यासाठी दबाव असे तक्रार अर्जात म्हटले आहे. बहिष्कृत केलेल्या कुटुंबियांनी पंचाना भेटून वाळीत टाकू नका यासाठी विनंती केली होती. त्यावर काहीच तोडगा निघालेला नाही. दरम्यान, दि. 3 जुलै 2017 पासून महाराष्ट्रात जात पंचायत विरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध विरोधी कायदा लागू झाल्याची माहिती या पिडित कुटुंबियांना मिळताच बहिष्कृत केलेल्या कुटुंबीयांतील जणांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी अर्जावर उमेश रूद्राप, रवी उद्राप, चेतन कुतपेल्ली, रामचंद्र चिंचणे, नंदकिशोर रत्नपाल, चंद्रकांत इंदुरकर, रविंद्र बेलिटकर, चंदरराम कुतपेल्ली आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्यध्यक्ष नंदिनी जाधव, भगवान काळभोर, श्रीराम नलावले आदी पदाधिकारी पोलिस ठाण्यात उपस्थित होते.

या कायद्यानूसार आरोपींना तीन वर्षापर्यंत कारावास किंवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्हीही अशा शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे असेही मिलिंद देशमुख यांनी सांगितले. दरम्यान या कायद्यानूसार गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गोवेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)