आंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण

श्‍वेता शिगवण

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यापासून अवघे 24 कि.मी. अंतरावरील आंजर्ले गाव. गाव तसे छोटेच परंतु निसर्गालाही हेवा वाटवे इतके सुंदर आणि निसर्गरम्य. पावसामध्ये या गावाचे सौदर्य अजून खुलून येते. हिरवा साज घातलेला उंच डोंगर कडा, स्वछ समुद्रकिनारा, उसळणाऱ्या लाटा, मंत्रमुग्ध करणारा मातीचा सुगंध, काळे-पांढरे आकाश आणि बरेच…. पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण. आंजर्ले गावाला जातानाच घाटाच्या प्रत्येक वळणावर निसर्ग आपल्या मनाला साद घालायला लागतो. डोंगरातून कोसळणारे प्रत्येक लहान-मोठे धबधबे आपले लक्ष वेधून घेते. आंजर्ला गावात प्रवेश करण्यासाठी खाडीतून गावाला जोडणाऱ्या भव्य लांब पुलावरून जावे लागते. आंजर्ल्याचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे कड्यावरचा उजव्या सोंडेचा गणपती. महाराष्ट्रात उजव्या सोंडेचा गणपती हे जागृत देवस्थान मानले जाते. याबाबत तेथील लोकांची एक समजूत आहे. आधी गणपतीचे हे मंदिर समुद्र किनारी होते. परंतु नंतर पाण्याची पातळी वाढल्याने ते मंदिर पाण्याखाली गेले. नंतर हे मंदिर डोंगरावर बांधले गेले म्हणून याला कड्यावरचा गणपती असे नाव देण्यात आले. अस्सल कोकणी धाटणीचा गणपतीचे रूप पाहून मन प्रसन्न होते. असे म्हंटले जाते कि गणपतीने नवीन मंदिरात प्रवेश करताना पहिले पाऊल डोंगरावर ठेवले व दुसरे पाऊल मंदिरात. डोंगरावरील उमटलेला पाऊलाचा ठसा आजही तेथे कायम असून त्या पाऊलावर छोटेसे मंदिरही बांधण्यात आले आहे. तेथे जाण्यासाठी डोंगरातून पायऱ्या करण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणपतीचे पूर्ण मंदिर हे जांभ्याच्या दगडातून बांधले असून त्या शेजारीच शिवमंदिरही आहे. मंदिराच्या वातावरणात मन पूर्णतः शांत होते. तसेच मंदिरासमोर विहीर असून त्यात कासव आहेत. मंदिराच्या बाहेर सुप्रसिद्ध कोकण मेवाची दुकाने असल्याने हा कोकण मेवा चाखण्याची इच्छा सर्वांनाच होते. डोंगरावरून सूर्य समुद्रात जाताना म्हणजेच मावळताना बघणे एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. डोंगराच्या पायऱ्या खाली उतरून गेल्यावर कोकणच्या गावाकडील घरांनी, नारळ व सुपारीच्या दुतर्फा झाडीनी सजलेल्या रस्त्यावरून पाच मिनिटे चालत गेल्यावर लगेचच समुद्र किनारा लागतो.

दूरवर पसरलेल्या समुद्रकिनारी फेसाळणाऱ्या लाटासोबत वेळ कसा जातो हे समजतच नाही. गावातच डोळ्यात भरण्यासारखी सुंदर मूर्ती असलेले दुर्गा मातेचे एक मंदिरही आहे. त्यालाही अवश्‍य भेट द्यावी आंजर्ला गावाच्या जवळच हर्णे समुद्र किनारा व हर्णे किल्ला, दापोली, केळशी अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. लाल मातीतले असे आंजर्ले गाव मनात घर करून जाते. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. तरीही शहराच्या प्रदूषणाचे गालबोटही न लागलेले असे हे गाव. कधी येताव म…. आमच्या गावाला…


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)