अ दर्जाच्या शाळांचे बाह्यमुल्यमापन फेब्रुवारीत

पुणे -संपूर्ण देशभरासाठी लागू करण्यात आलेल्या शाळासिद्धी मुल्यांकन प्रक्रियेंतर्गत स्वयंमुल्यमापनात अ श्रेणी प्राप्त राज्यभरातील 34 हजार 491 शाळांचे बाह्यमूल्यमापन फेब्रुवारी 2018 मध्ये होणार आहे. त्यासंबंधीची केंद्रस्तरीय बैठक दिल्ली येथे दि. 23 व 24 जानेवारी रोजी पार पडली असून लवकरच राज्यातील शाळांचे मुल्यमापन करण्याचे काम सुरु होणार आहेत.

शाळा सिध्दीचे बाह्यमुल्यमापन लवकरच होणार असून याबाबत बैठक झाल्यानंतरच सविस्तर सांगता येईल. हे मुल्यमापन राष्ट्रीय पातळीवरील निकषांनुसार होईल. तसेच यासाठी कोणती त्रयस्थ संस्था नाही तर शिक्षण विभागाच्या पर्यावेक्षकीय यंत्रणेमार्फतच हे मुल्यमापन केले जाईल.
असिफ शेख, राज्य संपर्क प्रमुख
शाळा सिध्दी उपक्रम

याबाबत राज्याची नियोजन कार्यशाळा दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे. गेल्या वर्षभरापासून स्वयंमुल्यमापन केलेल्या शाळांना आता बाह्यमुल्यमापनाला सामोरे जावे लागणार असून त्यानंतर संबंधित शाळांची श्रेणी ठरणार आहे. स्वयंमुल्यमापन व बाह्यमुल्यमापन यांच्या एकत्रीकरणातून जी श्रेणी येईल त्यानुसार संबंधित शाळांना शाळासिद्धीचा दर्जा प्रदान करण्यात येणार आहे.
शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यभरात गेल्या वेळी स्वयंमुल्यमापन प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 1 लाख 9 हजार 98 शाळांपैकी 99 हजार 650 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. त्यातील अ श्रेणी प्राप्त शाळांच्या बाह्यमुल्यमापनाची प्रक्रिया मार्च 2017 मध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र अचानक 241 शाळांचे बाह्यमुल्यमापन झाल्यानंतर ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. स्वयंमुल्यमापनात अ दर्जा मिळालेल्या शाळा या विद्यार्थी संख्येअभावी बंद करण्याचा प्रकारही शासनाने केला आहे. त्यामुळे खरोखरच या मुल्यमापनाला काही अर्थ आहे का असा प्रश्‍न शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आता अखेर ही बाह्यमुल्यमापनाची प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्यानंतर खऱ्या अ दर्जाच्या शाळांचा आकडा समोर येऊ शकेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)