अॅप वापरा; हेअर स्टाईल करा…

घरगुती समारंभ, पार्टी, औपाचारिक भेटी अशा विविध कार्यक्रमांसाठी आपण नव-नव्या फॅशनचा विचार नेहमीच करत असतो. त्याचप्रमाणे केसांची स्टाईलदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. केसांमुळे एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालं आहे. लॉंग हेअर, शॉर्ट हेअर यामुळे आपला लूक एकदम पालटू शकतो. त्यामुळे या केसांना विशिष्ट कार्यक्रमात कसं खुलवता येईल हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

नेहमीचा पफ, मोकळे केस या पद्धतीव्यतिरिक्त वेगळी काय स्टाईल करता येईल याकडे प्रत्येक तरुणीचा कल असतो. काही वेळा केसांना वेगळा लूक देण्यासाठी पार्लरमध्येही हजारो पैसे खर्च केले जातात; परंतु आता मात्र गुगल प्ले स्टोअरही आपण केस कसे बांधायचे याकरता विविध अॅप्स आली आहेत. यामुळे आपल्याला केसांची निरनिराळी हेअर स्टाईल करता येऊ शकते. ही अॅप्स प्ले स्टोरवर मोफत असल्याने आपल्याला हजारो रुपये खर्च करण्याचीही गरज नाही. यातल्या काही ऍप्सची माहिती करून घेऊ या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्‍यूट गर्ल्स हेअर स्टाईल
क्‍यूट गर्ल्स हेअर स्टाईल हा अॅप आपल्याला मदत करेल. यामध्ये कमीत कमी वेळात आकर्षक हेअर स्टाईल कशी करता येईल याविषयी सांगण्यात आले आहे. मोकळे केस ठेवण्याची इच्छा प्रत्येकीचीच असते, परंतु ते दिवसभर व्यवस्थित राहात नसल्याने मोकळ्या केसांचा विचार कमी जणांकडून केला जातो. परंतु या अॅपमध्ये मोकळे केस ठेवण्याचेही विविध उपाय दिले आहेत. 3 ते 5 मिनिटांत केस बांधणे, बॅंग- फ्रींग हेअरस्टाईल असे अनेक प्रकार आपल्याला या अॅपमध्ये पाहायला मिळतील. शाळेत जाणाऱ्या लहान मुलींपासून ते ऑफिसला जाणाऱ्या प्रोफेशनल तरुणींसाठी या अॅपमध्ये निरनिराळ्या हेअर स्टाईल पाहायला मिळतील.

ब्राईडेड हेअर स्टाईल
आजकाल प्रत्येक ड्रेस स्टाईलवर वेणी बांधण्याचा नवा ट्रेंड आला आहे. पारंपरिक लूकपासून ते वेस्टर्न लूकपर्यंतच्या प्रत्येक स्टाईलवर वेणी बांधली जाते. त्यातही लांबसडक केस असले की खजूर वेणी, साधी वेणी सर्रास बांधल्या जातात. परंतु याच वेणींना आकर्षक लूक देण्यासाठी ब्राईडेड हेअर स्टाईल अॅपचा उपयोग करता येईल. या अॅपमध्ये आपल्या नेहमीच्या साध्या वाटणाऱ्या वेणीला वेगळा लूक कसा द्यायचा हे सांगितले आहे. फोटोसहित व्हिडीओज येथे उपलब्ध असून वेणी बांधण्याची संपूर्ण पद्धत येथे आहे. ट्‌विस्ट ब्राईड, लेस ब्राईड, वॉटरफॉल ब्राईड, फिश टेल (खजूर वेणी), क्रॉस ब्राईड, फ्रेंच ब्राईड, ट्रिपल ब्राईड, शॉर्ट हेअर ब्राईड, फ्रोजन ब्राईड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या आपल्याला येथे पाहायला मिळतात.

पेनाडोस फेसिल
काहींचे केस कुरळे असतात, तर काहींचे सरळ. त्यामुळे एखाद्या समारंभात केसांची रचना नेमकी कशी करावी याबाबत साऱ्याच जणी संभ्रमात पडतात. या अॅपमध्ये कुरळ्या किंवा सरळ केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर स्टाईल आपल्याला पाहायला मिळतील. आजकाल प्रत्येक तरुणी पफ काढताना दिसते. तर या अॅपमध्ये विविध प्रकारचे पफ कसे काढावेत, मोकळे केस ठेवण्यासाठी काय करावे, क्राऊन हेअर स्टाईल असे विविध प्रकार यात आपल्याला अनुभवता येईल. नेहमी पार्टी, मिटिंगमध्ये व्यस्त असणाऱ्या तरुणींना हे अॅप उपयुक्त आहे.

इझी हेअर स्टाईल
हे अॅप अगदी नावाप्रमाणेच इझी आहे. नेहमीच पोनी बांधून किंवा मोकळे केस सोडून वैताग आला असेल तर काय करावे हा प्रश्न पडतो. घाईगडबडीमध्ये केस कसे बांधावे हा यक्ष प्रश्न आजकाल प्रत्येक महिलेला पडतो. त्यातही अगदी थोड्या वेळात नव्या पद्धतीने केस कसे बांधायचे झाले तर अगदी कसं तरी केस बांधून महिला तयार होतात. त्यासाठी या अॅपचा वापर होऊ शकतो. सोप्या आणि झटपट होणाऱ्या हेअर स्टाईलसाठी या अॅपमध्ये भरपूर प्रकार आहेत. एका बाजूला वेणी कशी बांधावी, पोनी बांधण्याचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत.

हेअर स्टाईल (स्टेप बाय स्टेप)
काही वेळा पार्टीला, महत्त्वाच्या कार्यक्रमांना, कॉलेज फेस्टिव्हलला, प्रेझेंटेशनच्या वेळेस आपण परिधान केलेल्या कपड्यांना अनुसरून केसांची स्टाईल करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, नेमक्‍या वेळेला आपण काय करावे हेच सूचत नाही. अशा वेळेस हेअर स्टाईल अॅप उपयोगात येऊ शकतं. कारण या अॅपमध्ये क्‍लासी हेअर स्टाईलचे भरपूर उपाय आहेत. अलिएस, बेले, क्वीन अशा खूप हेअर स्टाईल आपल्याला येथे मिळू शकतात.

प्रिन्सेस हेअर स्टाईल
आजकाल प्रत्येक कार्यक्रमाला वेणी बांधण्याचा एक नवा ट्रेंड येऊ घातला. वेस्टर्न लूक असो वा पारंपरिक पद्धत, वेणीने मात्र आपले स्थान टिकवून ठेवले आहे; परंतु आपल्याला वेणीचे फार फार तर दोन-चारच प्रकार माहीत असतील; परंतु प्रिन्सेस हेअर स्टाईलमध्ये मात्र 100 हून अधिक वेणींचे प्रकार उपलब्ध आहेत. फ्रेंच वेणी, पोनी, दोन बटांचा वापर करून तयार केलेली वेणी या ऍपमध्ये पाहायला मिळणार आहे. लहान केसांमुळे कधी कधी वेणी बांधणे फार अवघड होते. परंतु या अॅपमध्ये लहान केसांचीही वेणी कशी बांधायची ही पद्धत दाखवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वेअरवर परफेक्‍ट बसेल अशा वेणीचे प्रकारही अॅपमध्ये समाविष्ट आहेत.

– श्रुती कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)