अॅन्टी करप्शन 24×7 “ऑन ड्युटी’

लाचखोरांनो सावधान…

– संजय कडू

-Ads-

पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया वाढत असताना दुसरीकडे लाचखोरांचे प्रमाणही तितकेच आहे. इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात अॅन्टी करप्शनचे कार्यालय सायंकाळनंतर, सार्वजनिक सुट्ट्यांदिवशी बंद असते, असा समज अजूनही आहे. यामुळे कार्यालयीन वेळेनंतर किंवा सरकारी सुट्ट्यांदिवशी लाच स्वीकारण्याचा “ट्रेंड’ वाढला होता. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशावेळी लाचखोरांवरही कारवाई केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

लाचखोरांविरुद्ध कारवाईसाठी प्रशासनाने सुट्ट्यांदिवशीही एक पथक कायमस्वरुपी कारवाईसाठी तैनात ठेवले आहे. इतकेच नव्हे, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची हेल्पलाइन 24 तास सुरू ठेवण्यात आली आहे. अगदी रात्रीदेखील यावर तक्रार आली, तरी हे पथक कारवाईसाठी सज्ज असते. खंडाळा घाट पास करुन देण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकातील सुरक्षा रक्षकाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून 32 हजारांची लाच घेताना लोणावळा परिसरात पहाटे तीनच्या सुमारास पकडण्यात आले. याची तक्रार रात्री 10 वाजता हेल्पलाइनवर आली होती. यानंतर तातडीने हालचाल करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. त्यामुळे कारवाईसाठी प्रशासन रात्रीदेखील सज्ज असल्याचे यातून समोर आले आहे.

मध्यंतरी जिल्ह्यातील तलाठ्यांनी अॅन्टी करप्शन कारवाईची देवाणघेवाण करण्यासाठी खास व्हॉटस्‌ अॅप ग्रुप तयार केला होता. यामध्ये एखाद्यावर कारवाई झाल्यास ती माहिती तत्काळ ग्रुपवर टाकली जात होती. विशेष म्हणजे, लाचखोरीच्या अनेक “आयडियां’ची देवाण-घेवाणही येथे सुरू होती. हा ग्रूप अजूनही सुरू आहे. एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांचा धसका असला, तरी दुसरीकडे घाबरून का होईना, लाचेसाठी सर्वसामान्यांची अडवणूक केली जाते. सापळ्यात अडकू नये, यासाठी विविध क्‍लुप्त्या लढवल्या जात आहेत. यासाठी काही महाभाग तर आजवर झालेल्या कारवायांची पद्धतही अभ्यासतात. त्याची माहिती इतर अधिकाऱ्यांना देऊन सावध करतात. पण, असे महाभागही कारवाईत सापडतात. तर, लाचखोरांच्या क्‍लुप्त्या ओळखून दिवसेंदिवस प्रशासनदेखील “अपडेट’ होत आहे.

सावध लाचखोरांमुळे आव्हान वाढले 
लाचखोर कर्मचारी व अधिकारी लाच घेताना मोठ्या प्रमाणात दक्षता घेत आहेत. एका प्रकरणात अधिकाऱ्याने तक्रारदाराला तब्बल सहा महिने विविध ठिकाणी पैसे घेऊन बोलावले. मात्र, संशय आल्याने त्याने अखेर पैसे न घेणेच पसंत केले. तर, दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षपेक्षा दलालामार्फत लाच घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागापुढील आव्हान वाढले आहे.

लाचेची खाज सुटेना
सरकारी बाबूंवर धडाधड कारवाई होत असताना दुसरीकडे लाच घेणाऱ्यांच्या “हाताची खाज’ मात्र मिटताना दिसत नाही. सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांत पैशांसाठी अडविले जात आहे. यामध्ये महसूल विभाग, पोलीस दल, महावितरण, महापालिका, शिक्षण विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आघाडीवर असल्याचे आजवरच्या प्रकरणांतून दिसते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय शासकीय सुट्टीदिवशीही सुरू असते. तर हेल्पलाइन नंबर 24 तास कार्यरत असतो. यावर कोणत्याही वेळी नागरिकाने तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जाते. एखाद्या तक्रारदाराने रात्री उशिरा तक्रार केली, तरी खात्री झाल्यावर तातडीने कार्यवाही होते
– संदीप दिवाण, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.

हेल्पलाइन क्रमांक – 106
दूरध्वनी क्रमांक -020-26122134/26132802
व्हॉटस्‌ ऍप क्रमांक – 7875333333
इ-मेल आयडी- dysacbpune@mahapolice.gov.in
फेसबुक – www.facebook.com-maharashtraACB
वेबसाइट- www.acbmaharashtra.gov.in

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)