अॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडा-उच्च न्यायालय

मुंबई: सीडीआर केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  याप्रकरणी अटकेत असलेल्या अॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.  मुळात ठाणे पोलिसांनी केलेली ही अटकच बेकायदेशीर असल्याचे सांगत कायद्यापेक्षा पोलीस स्वत:ला वरचढ समजतात का? असा सवाल विचारत आपला संताप व्यक्त केला.

कायदा हातात घेऊन बेकायदेशीरपणे रिझवानला अटक करणाऱ्या ठाणे पोलिसांतील संबंधित अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच पोलिसांनी कायद्याच्या कक्षेत राहून आरोपीविरोधातील कारवाई सुरु ठेवावी असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. रिझवानच्या अटकेविरोधात त्याची पत्नी तस्निमने मुंबई उच्च न्यायालयात हबिस कॉर्पस अंतर्गत याचिका दाखल केली होती. कोणतीही पूर्व कल्पना न देता रात्री उशिरा ही अटक केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना थेट सवाल केला होता की, तुम्ही स्वत:हून आरोपीला सोडणार आहात? की आम्ही तसे आदेश जारी करू? यावर ठाणे पोलिसांनी माघार घेत आमची रिझवानला सोडण्यास हरकत नसल्याची कबुली न्यायालयासमोर दिली. उच्च न्यायालयाने रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे निर्देश देताच त्याच्या वकील पत्नीला कोर्टात अश्रू अनावर झाले. या निकालानंतर आपली प्रतिक्रिया देताना रिझवान सिद्दीकीचे वकील रिझवान मर्चंट यांनी ठाणे पोलिसांवर थेट पक्षपातीपणाचा आरोप केला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)