अहमदनगर: स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने आठ लाखांचा गंडा

शिराळ चिचोंडी शिवारातील घटना

पाथर्डी – शिराळ चिचोंडी शिवारात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील तिघांना बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून सुमारे आठ लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटण्याच्या घटना याच परिसरात यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. पोलिसांना लुटारू टोळीचा बंदोबस्त करण्यात अपयश आले. या घटनेमुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत समजलेली माहिती अशी की, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील मंदार गरुड यांना एक महिन्यापूर्वी श्रीकांत पेंटर नावाच्या व्यक्तीने फोन केला. “मी तुम्हाला ओळखतो. तुमच्या बदलापूरच्या वैशाली टॉकिजमध्ये आपली ओळख झाली आहे. माझ्याकडे साडेतीन किलो सोन्याने भरलेला हंडा आहे. तो हंडा आम्हाला विकायचा आहे,’ असे सांगितले. 23 जून रोजी मंदार गरुड व त्याचा मित्र अचिकेत विठ्ठल हेडाव असे दोघे शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. त्याच वेळेस पुन्हा श्रीकांत पेंटर यांचा फोन आला. “तुम्ही एकदा येऊन मला भेटून जा.’ तेव्हा गरुड व हेडाव शिराळ चिचोंडी गावाच्या शिवारात आले. तेव्हा श्रीकांत पेंटर व त्याच्या एका अनोळखी साथीदारानी त्यांना कपड्यात गुंडाळलेला सोन्याचा हंडा दाखवला. त्यातील एक सोन्याची अंगठी खात्री करण्यासाठी दिली. ती अंगठी गरुड यांनी सोनाराला दाखवली असता खरी निघाली. गुरुवारी (दि.28) मंदार गरुड, मित्र नचिकेत हेडाव, गरुड यांची आई शीला असे बदलापूरवरून त्यांच्या होंडा सिटी गाडीने सकाळी निघून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिराळ चिचोंडी शिवारात पोहोचले.

दरम्यान, श्रीकांत पेंटर हा वारंवार फोन करून त्यांना कुठपर्यंत पोहोचला, असे विचारत होता. तिघेही पांढरी पुलाजवळ पोहोचले असता आपण मागच्या वेळी जेथे भेटलो तेथे येण्याचा निरोप श्रीकांत पेंटर यांनी गरुड यांना दिला. गरुड मित्र व आईसमवेत शिराळ चिचोंडी गावाजवळ आले. त्यांना श्रीकांत पेंटर नावाच्या व्यक्तीने रस्त्याच्या उजव्या बाजूकडील रस्त्याने एक किलोमीटर आत कच्च्या रोडला बोलावले. तेथील मोकळ्या शेतात श्रीकांत पेंटर अंगात गुलाबी कलरचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घालून समोर आला. त्यांना म्हणाला की, “”साडेतीन लाख रुपये आणले का? आम्हाला अगोदर पैसे द्या.” तसेच त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारास म्हणाला, “”मी पैसे मोजतो. तुम्ही सोने घेऊन या.” गरुड यांनी साडेतीन लाख रुपये देताच दबा धरून बसलेल्या श्रीकांत पेंटरच्या 8 साथीदारांनी गरुड, त्यांचा मित्र व आईला मारहाण करून त्यांच्याकडील साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम व 20 तोळे सोने व 4 मोबाइल असा सात लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. नगर एमआयडीसी व पाथर्डी पोलीस ठाणे यांच्या हद्दीच्या वादामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)