अहमदनगर: सीना नदीच्या शुद्धीकरणासाठी 131 कोटी

file pic

नमामि अभियानाचे आराखडे जूनअखेर सादर करण्याचे निर्देश

नगर – देशपातळीवर केंद्र सरकारच्या वतीने नद्यांचे प्रदूषण थांबविण्याच्या हेतूने आणि शुद्धीकरणाच्या हेतूने “नमामि गंगे’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सीना नदीच्या सांडपाणी शुद्धीकरणासाठी नगर शहरातील फुलसौंदरमळा येथे 57 एमएलडीचा प्लांट लवकरच कार्यान्वित होणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या चार दिवसांत वर्कऑर्डर होऊन या प्रकल्पाच्या उभारणीचा शुभारंभ होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 131 कोटी रुपये अपेक्षित आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे “नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाचे सदस्य सचिव तथा पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला असून, चंद्रभागा अभियानांतर्गत असणाऱ्या कामांचे आराखडे कोणत्याही परिस्थितीत सादर करावेत, असे निर्देश दळवी यांनी दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“नमामि चंद्रभागा’ या प्रकल्पाचे आराखडे संबंधित विभागातील जिल्ह्यात करावयाच्या प्रस्तावित कामांचे आराखडे येत्या जुलैअखेर सादर करावेत. या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, महापालिकेचे उपायुक्‍त यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी व सोलापूर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्याच्या परिसरातून प्रवाहित असणाऱ्या या नदीची राज्यातील लांबी 552 किलोमीटर एवढी आहे. राज्यातील कृष्णा, गोदावरी, पैनगंगा, नर्मदा, तापी या नद्यांच्या बरोबरच चंद्रभागा अर्थात भीमा ही नदी जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. चंद्रभागा नदीवरती अनेक मोठे जलप्रकल्प आहे. या नदीच्या तीरावरील लाखो हेक्‍टर शेती चंद्रभागेच्या पाण्यानेच सुजलाम्‌-सुफलाम्‌ झाली. चंद्रभागेच्या अर्थात भीमेच्या मुळा-मुठा, इंद्रायणी, मुळशी, घोड, कुकडी आणि नगर जिल्ह्यातून वाहणारी सीना या प्रमुख उपनद्या आहेत. मागील काही वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे आणि शेती सिंचनासाठी उपयुक्‍त असणाऱ्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले. त्याचा शेती उत्पन्नावर आणि मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे आढळले. या पार्श्‍वभूमीवर नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जागतिकस्तरावरून हालचाली सुरू झाल्या. या नदी प्रदूषणमुक्‍तीसाठी केंद्र सरकारने “नमामि गंगे’ हे अभियान हाती घेतले. या अभियानाच्या धर्तीवर 12 ऑगस्ट 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “नमामि चंद्रभागा’ या प्रकल्पाची घोषणा केली. चंद्रभागा अर्थात भीमा ही महाराष्ट्रातील जीवनदायिनी नदी आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमा अर्थात चंद्रभागेचे उगमस्थान आहे. “नमामि चंद्रभागा’ या प्रकल्पाचा नद्यांचे प्रदूषण रोखणे, नद्यातील पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प कार्यान्वित करणे आणि नदीतीरावर वनीकरण सुशोभिकरण करणे हे उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)