अहमदनगर शहर प्रेस क्‍लब म्हणजे ‘तुमने पुकारा और हम चले आये’

संस्था म्हटले की वाद-विवाद आणि गटबाजी डोळ्यासमोर हमखास येते. मात्र, याला अहमदनगर शहर प्रेस क्‍लब ही संस्था अपवाद आहे. सर्वांना एकत्रित घेऊन मनभेद-मतभेद बाजूला सारत या संस्थेची उपक्रमशील वाटचाल सुरू आहे. संकटाच्या वेळी प्रत्येक पत्रकाराच्या मदतीला धावून जाणारे संवेदनशील मनाचे दिलदार अध्यक्ष मन्सूर शेख यांच्याकडे संस्थेची सूत्रे मागील 9 वर्षांपासून आहेत. प्रेस क्‍लबच्या प्रत्येक उपक्रमात सहकारी म्हणून भूमिका बजावणारे ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज सातत्याने मन्सूरभाईची मनःपूर्वक सोबत करीत आहेत. ही जोडगोळी प्रेस क्‍लबच्या बाबतीत जिल्हाभर “तुमने पुकारा और हम चले आए’ या भावनेतून शहरातील पत्रकारांसह जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाभरातील पत्रकारांच्या सहकार्यासाठी कार्यरत आहे. पत्रकारांसाठी राबविले जाणारे उत्तम उपक्रम, काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती, आवड यामुळे प्रेस क्‍लबचे अध्यक्ष मन्सूरभाई पत्रकारांचा आधारवड ठरले असून, प्रेस क्‍लब ही संस्था नव्हे तर परिवार झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पत्रकारांच्या सुख-दु:खासाठी अहमदनगर शहर प्रेस क्‍लबची गेल्या काही वर्षांपूर्वी स्थापना झाली. अनेक ज्येष्ठ पत्रकारांच्या पुढाकारातून प्रेस क्‍लबच्या लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मधल्या काळात प्रेस क्‍लबला घरघर लागली होती. परंतु, प्रेस क्‍लबला मन्सूर शेख यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं अध्यक्षपद लाभलं अन्‌ तेथूनच खऱ्या अर्थाने प्रेस क्‍लबची मरगळ हटली. मन्सूरभाई शेख यांच्या प्रभावी व नि:स्वार्थी कारभारामुळे प्रेस क्‍लबने गगनभरारी घेतली. मन्सूरभाई यांच्या कारभारामुळेच प्रेस क्‍लब आज खऱ्या अर्थाने नावारूपाला आले आहे. सुखाप्रमाणे दु:खातही धावून जाणारे मन्सूरभाई शेख आज खऱ्या अर्थाने पत्रकारांचे आधारवड ठरले आहे. मन्सूरभाईंनी एक प्रकारे नेतृत्वाची भूमिका खऱ्या अर्थाने निभावली आहे. त्यांचा आठ वर्षाचा कारभार निश्‍चितच अभिनंदनीय आहे यात अजिबात दुमत नाही. प्रेस क्‍लब अन्‌ मन्सूरभाई-महाराज अशी एक नाळच जुळली आहे.

सामाजिक उपक्रम –
संवेदनशीलतेची मदत :
मागील आठ वर्षांच्या काळात पत्रकार हिताचे अनेकविध उपक्रम राबवितानाच सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका प्रेस क्‍लबने बजावली आहे. शहिदांना अभिवादन, अतिरेकी हल्ल्याचा निषेध, प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिनिमित्त बालदिनाचा उपक्रम, सामाजिक सद्‌भाव-बंधुभावासाठी धार्मिक सलोख्याचे दिवाळी फराळ, महिलादिन, ईद मिलनसारखे उपक्रम प्रेस क्‍लबच्या वतीने आयोजित करण्यात येत असतात. मन्सूरभाईंनी यापलीकडे जाऊन कामकाजात संवेदनशीलता राखली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी चास येथील एक विवाहित तरुणी कार्यालयीन कामासाठी नगरला दुचाकीवरून येताना तिचा अपघात झाला. तेथून जाणाऱ्या-येणाऱ्यांनी फक्त बघ्यांची भूमिका घेतली. त्या ठिकाणी केडगावकडे निघालेल्या मन्सूरभाई व पत्रकार महेश महाराजांना वृत्तछायाचित्रकार समीर मण्यार यांनी हकीकत कळवली. त्या तिघांनी गंभीर जखमी झालेल्या युवतीस आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. मात्र, उशीर झाल्याने त्या युवतीचे दुर्दैवी निधन झाले. मदतीसाठी धावून जाण्याच्या वृत्तीचे हे उदाहरण बोलके आहे.

पारदर्शी कारभार-हिशेबी श्री शिल्लक
साडेअकरा लाख :
प्रेस क्‍लबच्या कार्याची धुरा मागील आठ वर्षांपासून प्रभारी अध्यक्ष म्हणून मन्सूर शेख यांच्याकडे आहे. संस्था म्हटलं की सगळेच रावबाजी करणारे नसतात! तरी देखील उणी-दुणी बाजूला ठेवून सर्वांना आपलेसे करीत मन्सूरभाईचे कामकाज सुरू आहे. मन्सूर या अरेबिक शब्दाचा भावार्थ आहे दिलदार, मदत करणारा! आपल्या नावातील भावार्थाला जागत पत्रकारांच्या मदतीसाठी प्रेस क्‍लबचा अध्यक्ष धावत आहे. कौतुकासाठी नव्हे तर कर्तव्यबुद्धीने पत्रकारांसाठी कार्यरत आहे. आम्ही त्याच्या पारदर्शक कारभाराचे साक्षीदार आहोत. “महाराज, नेकी करो दरिया में डालो,’ ही मन्सूरभाईची भूमिका आहे. म्हणून तर पदभार स्वीकारताना शून्य रकमेपासून मन्सूरभाईंनी सुरू केलेला प्रेस क्‍लबचा कारभार सर्व खर्च वजा जाता शिल्लक रक्क्‌म साडेअकरा लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

हाजी अजीजभाई चष्मावाला पत्रकारिता पुरस्कार
शहरात अनेक वृत्तपत्रांची कार्यालये आहेत. यातून विविध पदांवर अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने काम करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन उचित गौरव व्हावा, या हेतूने प्रेस क्‍लबच्या वतीने हाजी अजीजभाई पत्रकारिता, छायाचित्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात येत असते. त्यासाठी प्रस्ताव मागविले जात नाहीत. ज्येष्ठ पत्रकारांची निवड समिती पुरस्कारार्थी पत्रकारांची निवड घोषित करते. प्रस्ताव-अर्जाच्या याचनेशिवाय केलेल्या कामाची दखल घेऊन पत्रकारांचा गौरव करणारी अहमदनगर शहर प्रेस क्‍लब ही एकमात्र संस्था मानल्यास वावगे ठरणार नाही.

स्वनिधीतून पत्रकारांचा वाढदिवस
मन्सूरभाई मुळातच कल्पक विचारांचे असून, मागील आठ वर्षांच्या काळात त्यांनी पत्रकारांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. मागील दोन वर्षांपासून मन्सूरभाई स्वनिधीतून पत्रकारांचा वाढदिवस साजरा करतात. या वर्षात पत्रकारांना मोबाइल चार्जरची वाढदिवसानिमित्त भेट करण्यात येत आहे. पत्रकारांच्या पाल्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता पाल्यांचा गुणगौरव करतानाच परिवारातील सदस्यांसाठी सहलीचे, हुरडा पार्टीचे आयोजनही प्रेस क्‍लबच्या वतीने करण्यात येत असते. शारीरिक व्याधींच्या आजारपणातील प्रसंगात प्रेस क्‍लबच्या वतीने रोख स्वरूपात मदत केली जाते. संकटाच्या काळात रुग्णालयात धाव घेऊन दिला जाणारा धीर आणि केली जाणारी आर्थिक मदत ही पत्रकार बंधूंच्या कुटुंबीयांसाठी निश्‍चितच दिलासादायक आहे.

 

विनायक लांडे 

शहर प्रतिनिधी 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)