अहमदनगर: विकासकामांचा अनुशेष अडीच वर्षांत भरून काढू

मधुकर नवले यांचा विश्‍वास : के. डी. धुमाळांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी
निशिगंधा नाईकवाडींचे पक्षाला सहकार्य

अकोले – “गेल्या अडीच वर्षांच्या काळात विकासकामांचा शिलकी अनुशेष आगामी अडीच वर्षांत भरून निघेल. माजी मंत्री मधुकर पिचड व आ. वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहर सर्वांगीण विकासांनी परिपूर्ण होईल,’ असा ठाम विश्‍वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला.

नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार हे निश्‍चित झाल्यानंतर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, मावळते नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, राष्ट्रवादी युवकचे प्रांतिकचे सरचिटणीस राहुल देशमुख, डॉ. संदीप कडलग, डॉ. नूतन कडलग, संदीप शेटे, रमेश नाईकवाडी, विद्यार्थी प्रदेशचे सरचिटणीस विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

नवले म्हणाले की, माजी मंत्री मधुकर पिचड व आ. वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी नव्याने स्थापना झालेल्या अकोले नगरपंचायतीची ही ऐतिहासिक निवडणूक राष्ट्रवादीने 15 उमेदवार निवडून जिंकली होती, तर विरोधी पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी प्रथम नगराध्यक्ष म्हणून के. डी. धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत नगरपंचायतीचा कारभार पारदर्शीपणे करून अनेक विकासकामे मार्गी लावली.

त्यांच्या पदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव झाले. माजी मंत्री पिचड व आ. पिचड यांनी राष्ट्रवादीच्या सर्व 15 नगरसेवकांशी चर्चा करून सर्वानुमते संगीता अविनाश शेटे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी घोषित केली. त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड होणे ही औपचारिक बाब पक्षाच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे, असे ते म्हणाले. निशिगंधा नाईकवाडी यांनी पक्षाच्या उमेदवार संगीता शेटे यांच्यासाठी माघार घेऊन पक्षाला व पक्षश्रेष्ठींना सहकार्य केले याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)