अहमदनगर: महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा केव्हाही होणार खंडित

वीज बिलासह चालू थकबाकीचे एक कोटी रुपये


पाणीपुरवठा योजनेची 9 कोटी 67 लाखांची थकबाकी

नगर – जिल्हाधिकारी कार्यालयात 27 फेब्रुवारीला झालेल्या संयुक्त बैठकीत महापालिका नियमित वीज बिलासोबत चालू थकबाकीचे एक कोटी रुपये भरणार असल्याचा प्रस्ताव मनपाच्या वतीने महावितरणला देण्यात आला होता. या लेखी प्रस्तावानंतर मनपाच्या पाणीपुरवठा योजनेचा तोडलेला वीजपुरवठा महावितरणने पुन्हा जोडला. मात्र, महापालिकेकडून लेखी प्रस्तावानुसार नियमित बिलासह चालू वर्षाच्या थकबाकीतील एक कोटी रुपयांचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता महावितरणकडून पाणीपुरवठा योजनेची वीज केव्हाही खंडित केली जाऊ शकते, अशी माहिती अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी दिली आहे.

वारंवार सूचना, नोटीस देऊनही महापालिकेकडून नियमित बिलासह 2017-18 या चालू आर्थिक वर्षातील थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणने महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा फेब्रुवारी अखेरीस खंडित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत महापालिकेच्या वतीने दिलेल्या लेखी प्रस्तावात महापालिका नियमित बिलासह चालू आर्थिक वर्षातील थकबाकीचे दरमहा एक कोटी भरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मनपा पाणीपुरवठ्याच्या 3 जोडण्यांचे फेब्रुवारी-2018 या महिन्याचे नियमित मासिक वीजबिल 1 कोटी 43 लाख 92 हजार रुपये आहे. मनपाने या नियमित बिलासह थकबाकीतील 1 कोटी असे एकूण 2 कोटी 43 लाख 92 हजार रुपये मुदतीत भरणे आवश्‍यक होते. मात्र, महापालिकेकडून संबंधित रकमेचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे 24 तासाच्या आत सदर रकमेचा भरणा करावा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशी नोटीस 20 मार्च रोजी मनपा आयुक्तांना पाठविण्यात आली. मात्र, महापालिकेकडून अद्यापि रकमेचा भरणा करण्यात आलेला नाही. परिणामी, पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे पाऊल महावितरणला उचलावे लागत असून, जनतेच्या संभाव्य गैरसोयीस महावितरण जबाबदार राहणार नसल्याचे महावितरणने कळविले आहे.

चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2017 पासून पाणीपुरवठा योजनेच्या 3 वीजजोडणीचे वीजबिल 17 कोटी 19 लाख 41 हजार रुपये आहे. त्यापैकी महापालिकेने आतापर्यंत फक्त 7 कोटी 82 लाख 80 हजार रुपयांच्या बिलाचा भरणा केला. चालू वर्षात पाणीपुरवठा योजनेचे 9 कोटी 67 लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महापालिकेकडे पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलाचे जानेवारी-2018 अखेर एकूण 165 कोटी रुपये थकीत आहेत. राज्यभरातील थकीत बिलामुळे महावितरणची झालेली आर्थिक कोंडी आणि सरते आर्थिक वर्ष या पार्श्वभूमीवर नियमित बिलासह थकबाकी वसुली अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणकडे इतर पर्याय नाही. नियमित वीजबिलासह चालू थकबाकी भरून वीज खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)