“अहमदनगर पहिली मंडळी’ ची निवडणूक घेण्याचे आदेश

स्थगितीस उच्च न्यायालयाचा नकार; 25 ऑक्‍टोबरनंतर आता निवडणूक

नगर –अहमदनगर पहिली मंडळी या चर्चच्या विश्‍वस्त मंडळाची निवडणूक 25 ऑक्‍टोबरनंतर घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्‍तांच्या आदेशाला स्थगिती देण्यास न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांनी नकार दिला.
याबाबतची अधिक माहिती अशीः या विश्‍वस्त संस्थेवर जॉन्सन शेक्‍सपिअर व अन्य व्यक्तींची निवड करण्यात आली होती. त्यांची मुदत 2015 मध्ये संपली; परंतु त्यानंतर त्यांची नियमित नियुक्‍ती व्हावी, यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट, त्यांच्या कारभाराविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यातील काही तक्रारी या गैरव्यवहाराच्याही होत्या. या विश्‍वस्त संस्थेच्या जमा-खर्चाचा तपशील दरवर्षी सादर करणे आवश्‍यक होते; परंतु 2016 पूर्वीचे लेखापरीक्षण अहवालच दाखल करण्यात आलेले नाहीत. संस्थेच्या मुदतठेवीतून घेण्यात आलेले वाहन दुसऱ्याच्याच नावे होते. त्यामुळे या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कार्यकक्षेत प्रशासकाची नियुक्ती करणे बसत नाही, त्यामुळे याबाबतचा रेव्ह. डॉ. सनी मिसाळ व नंदप्रकाश शिंदे यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. उर्वरित मुद्‌द्‌यांवर मात्र विचार करण्यात आला.
याबाबत म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावूनही जॉन्सन शेक्‍सपिअर यांच्यासह सहा जण गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. शेक्‍सपिअर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहमदनगर पहिली मंडळी या शहरातील सर्वांत जुन्या चर्चचे विश्‍वस्त मंडळ जास्तीत जास्त काळ कसे कारभार पाहील, यासाठी प्रयत्न केले. धर्मादाय आयुक्तांच्या चौकशीत ही हे विश्‍वस्त मंडळ अधिक काळ राहू देणे गैर आहे, असे मत नोंदविण्यात आले आहे. घटनेप्रमाणे विश्‍वस्तांची नेमणूक न झाल्यास निधीचा अपव्यय होण्याचे स्पष्ट मत चौकशी अहवालात नोंदविण्यात आले होते. त्यामुळे नगर येथील सह धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक पी. एम. आंधळे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले.
या आदेशाला शेक्‍सपिअर व त्यांच्या चार सहकाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथे श्रीमती एम. एस. म्हसे यांनी बाजू मांडली, तर सनी मिसाळ व नंदप्रकाश शिंदे यांच्या वतीने किशन शिंदे यांनी काम पाहिले. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना 24 ऑक्‍टोबरनंतर निवडणूक घेण्यास कुणाची हरकत नाही ना, अशी विचारणा केली. त्यात दोन्ही बाजूंनी आक्षेप न घेतल्याने उच्च न्यायालयाने अर्जदार शेक्‍सपिअर यांचा अर्ज फेटाळून लावताना पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्तांनी दिलेला या विश्‍वस्त संस्थेची निवडणूक घेण्याचा आदेश कायम केला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)