अहमदनगर: ठेकेदारावर कारवाईस मनपा प्रशासनाचा ठेंगा

प्रशासनाची दोन्ही बाजूंनी कोंडी
शेख यांनी आज प्रशासन, पदाधिकाऱ्यांना पत्र देत उद्यापर्यंत थकीत बील न मिळाल्यास फर्निचर घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकऱ्यांची संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भूमिका आणि ठेकेदाराची बिल न मिळाल्यास फर्निचर घेऊन जायची भूमिका यामुळे मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; आज फर्निचर उचलून नेणार

नगर -महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह सभागृहाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे थकीत बिल न दिल्याने मंगळवारी उपमहापौरांच्या दालनातून फर्निचर उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देऊनही प्रभारी आयुक्त असलेल्या आणि जिल्हाधिकारीही असलेल्या राहुल द्विवेदी यांच्या आदेशाला महापालिकेच्या प्रशासनाने केराची टोपली दाखविली. आता तर बील देण्यासाठी ठेकेदाराने उद्या (ता. 14) ची मुदत दिली असून बील न मिळाल्यास फर्निचर उचलून नेण्याचा इशारा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ठेकेदार इरफान शेख यांनी महापालिकेत चार वर्षापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचरचे तसेच सभागृहातील फर्निचरचे काम केले होते. हे काम 30 लाख रुपयांत करण्याचे ठरले. त्यातून 15 लाख रुपयांचे बील मंजूर झाले. उर्वरित बील मिळावे, यासाठी शेख यांनी प्रशासकीय पातळीवर मोठे प्रयत्न केले. महापौर सुरेखा कदम यांनी कॅफो मानकर यांना पत्र देऊन बिलातील रकमेपोटी पाच लाख रुपये तात्काळ द्यावे, असे आदेश दिले; परंतु त्यावरदेखील प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही. या सर्व प्रकरामुळे वैतागलेल्या शेख यांनी मनपाला दिलेले फर्निचर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी मंगळवारी उपमहापौरांच्या दालनातील फर्निचर उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मनपातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. महापौर कदम, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, उपमहापौर अनिल बोरुडे यांनी शेख यांची समजूत काढली. त्यावर त्यांनीही सामापोचराची भूमिका घेतली. कदम यांनी ठेकेदाराच्या बिलाबाबत जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला. द्विवेदी यांनी मनपातील फर्निचर बेकायदेशीपद्धतीने हलविले, म्हणून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईचे आदेश सामान्य प्रशासनाला दिले. जिल्हाधिकऱ्यांच्या या भूमिकेमुळे महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली.

दरम्यान, ठेकेदार शेख यांनी बील मिळाले नाही, तर फर्निचर घेऊनच जाणार, अशी ठाम भूमिका घेतली. आपल्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी चालतील, असे ते म्हणत आहेत. महापालिकेतील सामान्य प्रशासनाचे प्रभारी उपायुक्त एस. बी. तडवी यांनी घटनेची माहिती घेतली; परंतु बुधवारी सायंकाळपर्यंत संबंधित ठेकेदाराविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नव्हती. उपमहापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचर, सोफासेट सर्व काही सुस्थितीत आहे. आपण स्वत: फर्निचरची पाहणी केली आहे. वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारचे कारवाईचे आदेश नाहीत. त्यामुळे अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही, असे तडवी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)