नगर – गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दर महिन्याच्या 2 ते 3 तारखेला होणारे पगार आता थेट 15 तारखेनंतर होत असल्याने कर्मचारी वैतागले आहे. विशेषतः कर्मचारी पतसंस्थेसह बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्‍कम उशिराने भरण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
जानेवारी महिन्यापासून जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने होत आहेत. सामान्य प्रशासनाकडून कोषागार विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराचे बिले पाठविण्यास उशीर होत असल्याने कोषागार विभागाकडून पगार करण्यास विलंब होत आहे. सामान्य प्रशासनकडून तातडीने पगार बिले पाठविण्यात आल्यास पगार वेळेत होतील. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून ही बिले पाठविण्यास विलंब होत आहे. याकडे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पगार बिले पाठविण्यास विलंब केला जात आहे. यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्‍त केले आहे.

पंचायत समितीसह विविध विभागांकडून यापूर्वी 22 ते 23 तारखेपर्यंत पगार बिले सामान्य प्रशासनकडे पाठविण्यात येत होती. त्यानंतर या विभागाकडून 27 ते 28 तारखेपर्यंत ती बिले कोषागार विभागात पाठविण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार हे 2 ते 3 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होत होते; पण गेल्या जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार थेट 15 तारखेनंतर जमा होत आहे. मागील एप्रिल महिन्याचा पगार आज (बुधवारी) कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. त्यामुळे कर्मचारी वैतागले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून अशा पद्धतीने पगार 15 तारखेनंतर झाल्याने महिन्याभराचे आर्थिक गणितच बिघडले आहे. कर्मचारी पतसंस्थेसह बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्‍कम 15 तारखेच्या आत जमा होत नसल्याने कर्मचाऱ्यांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. नाहक दंडाची रक्‍कम कर्मचाऱ्यांना भरावी लागत आहे. त्यामुळे याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)