अहमदनगर जिल्ह्यातील दळणवळण साधनांचा रंजक मागोवा…

रेल्वे, विमान, रस्ते, इंटरनेट, आदी दळणवळण साधनांमुळे कोसो दूर असलेली गावखेडी एकमेकांना जोडली गेली. दळणवळण साधनांनी जोडलेल्या गावांचा विकासही सुसाट होऊ लागला आहे. शहरी, ग्रामीण भागातील देवाण-घेवाण होऊन लोकांचे राहणीमानही उंचावले असून, असाच एक जिल्ह्यातील दळणवळण साधनांचा रंजक मागोवा…

आज जिल्ह्यातील एकूणच जीवनशैलीसाठी दळणवळण, वाहतूक या बाबी सर्वात महत्त्वाच्या घटकांमध्ये मोडल्या जातात. अन्न, वस्त्र, निवारा या तीन जीवनावश्‍यक गरजांमध्ये आजच्या जीवनशैलीत दळणवळण, वाहतूक यांचाही समावेश झाला आहे. यामध्ये वाहतूक ही एकंदर महत्त्वाची गरजच बनली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाहतुकीच्या साधनांमध्ये झालेले आमूलाग्र बदल आजच्या जीवनशैलीत अनन्यसाधारण आहेत. यामुळेच वाहन उद्योगाला जगाच्या अर्थकारणात एक अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. वाहन उद्योगाने एकंदर देशातील अनेक क्षेत्रांमध्ये आपली गरज केव्हाच सिद्ध केलेली आहे. उद्योगांचा विकास, विस्तार, विकासाची कामे यामध्ये वाहनांचे आणि वाहन उद्योगांचे महत्त्व हे त्यामुळेच पायाभूत सुविधा म्हणूनच पहावे लागते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन इतकेच वाहनांचे महत्त्व राहिलेले नाही किंवा वाहन ही चैन वा केवळ राजे-महाराजे, संस्थानिक व श्रीमंत, गर्भश्रीमंत यांचीही मक्तेदारी राहिलेली नाही. आर्थिक विकासामध्ये वाहन उद्योगाने महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच वाहन उद्योगाने आपली गतीही चांगलीच वाढविली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रगतीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. आजघडीला जिल्ह्यातील वाहन उद्योगांना आवश्‍यक अशा मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते, पूल या घटकांच्या संख्येत-प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात, लोकांच्या जीवनशैलीत फरक पडला आहे. शहरीकरणाकडे वाटचाल अधिक जोमाने सुरू झाली आहे हे जरी सत्य असले व त्यामुळे आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे लोकांच्या मानसिकतेत, जीवनशैलीत चांगला-वाईट जो फरक पडला आहे हे जरी सत्य असले तरी त्यामुळे वाहनांच्या संख्येत पडलेली व पडत असणारी भर पेट्रोल-डिझेल या इंधनावर देण्यात येणाऱ्या सरकारच्या सवलतींबाबतचा वाद, सीएनजी-एलपीजी या पर्यायी इंधनावरही वाहने चालविण्यासाठी दिला जाणारा भर, सोलर ऊर्जा, वीज, इतकेच नव्हे तर पाण्यावरही मोटार चालविता येईल या दिशेने चाललेली संशोधने अशा विविध सकारात्मक व नकारात्मक घटकांचा आज वाहन उद्योगावर परिणाम होत आहे. परंतु, वाहनांमुळे गतिमान रस्त्यांमुळे जिल्ह्यातील प्रगती उत्तरोत्तर वाढत आहे.

भारतात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावलेल्या अहमदनगर रेल्वेस्थानकाच्या प्रगतीची वाटचाल सुरूच आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरामदायी प्रतीक्षालय, टापटीप या सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून देणारे हे स्थानक रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणारे अहमदनगर रेल्वेस्थानक महत्त्वाचे स्थानक आहे. एप्रिल 1878 मध्ये दौंड-मनमाड या लोहमार्गावरील नगरचे रेल्वेस्थानक कार्यान्वित झाले. पुणे, कोल्हापूर व दक्षिण भारतातून उत्तरेकडे जाणाऱ्या या रेल्वेंसाठी दौंड-मनमाड हा महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ग्रेट इंडियन पेनिनसुलामार्फत 1868 मध्ये व नंतर तत्कालीन पीडब्लूमार्फत 1876 मध्ये दौंड-मनमाड या 197 किलोमीटर लांबीच्या लोहमार्ग निर्मितीसाठी त्याकाळी तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये निधी खर्च झाला होता. 140 वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेसाठी हे स्थानक कार्यान्वित झाले. मागील दीड शतकाच्या वाटचालीत बदलत्या काळानुसार रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाची सुविधा देत या स्थानकाने देशभरात अग्रक्रम मिळवला.

आज रोजी अहमदनगर रेल्वेस्थानकावर अप आणि डाऊन गाड्यांची संख्या प्रतिदिन तब्बल 70 आहे. यात डेली, विकली, बायविकली आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. प्रतिदिवशी सुमारे 7 हजार प्रवाशांची ये-जा या स्थानकावर होत आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांना या स्थानकावर सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या असल्याने या दळणवळण साधनांनी अधिक गतिमानतेने गाव, शहर एकमेकांना जोडली गेली आहे आणि याच दळणवळण साधनांमुळे ग्रामीण शहरातील विकास मोठ्या प्रमाणावर होण्यास मोलाचा वाटा आहे. घोडागाडीपूर्वी नगरमध्ये मुख्य वाहतुकीचे साधन बैलगाड्या, त्यानंतर घोड्याने चालवलेला टांगा हे वाहन नगरमध्ये दाखल झाले. सुरुवातीला एक घोड्याचा टांगा आणि नंतर दोन घोड्यांचा टांगा आला. त्यानंतर घोड्यांनी ओढले जाणारे एक भारदस्त वाहन नगरमध्ये दाखल झाले. या घोडागाडीची सुरुवात म्हणे ब्रिटनमध्ये झाली. मजेचा भाग असा की, असेच वाहन आपल्या रामायण-महाभारतात रथ या नावाने प्रसिद्ध होते आणि देवादिकांना तसेच राजे-रजवाड्यांना प्रवास करण्यासाठी ते वापरले जायचे. अनेक वर्षे नगरकरांची इमाने-इतबारे सेवा केल्यानंतर कालांतराने नगरमधील घोडागाडी अस्तंगत झाली. नगर येथील स्टेशन ते स्टॅण्ड अशा मार्गावरील हे टांगे अनेकांना आठवत असतील. अनेकांनी लहानपणी टांग्यातून प्रवास केल्याचे आठवत असेल. जिल्ह्यातील रस्त्यांचा विचार केला असता संगमनेर तालुक्‍यातून पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग (क्र. 50) जातो. तसेच, कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्गही पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्‍यांतून जातो.

पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून, अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (1948 मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. 197 कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने दुर्गम, दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या सुपा, कान्हूर पठार, निघोज, भाळवणी औद्योगिक म्हणून नावारूपाला आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील पुढाकार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कोसो दूर असलेली खेडी एकमेकांना जोडण्यात मोठा सहभाग आहे. नगरमध्ये प्रामुख्याने कायनेटिक इंजिनिअरिंग, जी.के.एन. सिंटर्ड मेटल्स, के.एस.पी.जी. ऑटोमोटिव्ह, इटॉन, हॉगानाज इंडिया, सिद्धी फोर्ज ग्रुप, टेक्‍नो ट्रॅक इंजिनिअर्स, क्‍लासिक व्हिल्स, इंडो स्कल्प, सुयश ग्रुप या नामांकित कंपन्या आहेत. या कंपन्यांना सुटे भाग पुरवण्यासाठी काही छोट्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमार्फत जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतून युवकवर्ग मोठ्या प्रमाणावर शहराकडे आकर्षित होऊन येथे स्थायिक होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे.

जिल्हा साखर कारखानदारीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. नगर जिल्हा डेअरी क्षेत्रातही आघाडीवर आहे. प्रभात, एस. आर. थोरात, राजहंस, साईकृपा, प्रियदर्शनी हे उद्योग मोठ्या प्रमाणावर आगेकूच करत आहेत. जिल्ह्यात असलेल्या उद्योगांचा आता आपल्याला बऱ्यापैकी अंदाज आला असेल. राहणीमान उंचावण्याचे कारण ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृती यांचे या दळणवळण साधनांमुळे एकत्रीकरण होत आहे. ग्रामीण भागातून शहराकडे आलेली मुले शहरातील पेहराव पाहून वागू लागतात आणि हळूहळू आर्थिक स्थितीही सुधारू लागल्याने राहणीमान उंचावले जाते. जिल्ह्यात सुरू झालेल्या शिर्डी विमानतळामुळे जिल्ह्याला जगभरातून येणारे भाविक जोडले गेले आहे. दळणवळण साधनात विमानतळामुळे गाव, शहर, तालुके, जिल्हे, राज्य एकमेकांशी जोडले गेले आहे. शिर्डी विमानतळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिर्डीच्या 14 कि.मी. नैऋत्येस काकडी गावाजवळ असलेले एक विमानतळ आहे. या विमानतळाचे बांधकाम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हाती घेतले व यासाठी एकूण बांधकाम खर्च सुमारे भारतीय रुपये 340 कोटी लागला आहे.

1 ऑक्‍टोबर 2017 रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्‌घाटन झाले आहे. विमान या दळणवळण साधनामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होऊन काही दिवसांचे काम एका दिवसावर आले आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांतील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग, रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्जोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. दर्जोन्नत करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे गाव ना गाव जोडले गेले. आठवडेबाजार, तालुक्‍याच्या ठिकाणी मोठ्या बाजारपेठ उपलब्ध झाल्या. गावागावात विकास झाल्याने ग्रामीण भागातील विकास गतिमान झाला आहे. एसटी महामंडळामुळे गावागावात पोहोचणाऱ्या एसटीचा विकासात मोठा वाटा आहे. त्यातच आता खासगी गाड्यांच्या वाढत्या प्रभावाने गाव तेथे रस्ते झाले आहे. रस्ते, इंटरनेट, रेल्वे, आदी दळणवळण साधनांनी एकप्रकारे क्रांती घडविली आहे. या क्रांतीनेच जिल्हा विकासाच्या दिशेने सुसाट सुटला आहे.

इंटरनेट एक प्रचंड नेटवर्क
इंटरनेटचा विचार करता त्याला महाजाल म्हटले जाते. इंटरनेट एक प्रचंड नेटवर्क आहे. इलेक्‍ट्रॉनिक अभियांत्रिकीतील माहिती देवाण-घेवाणीच्या प्रमाण संवादपद्धतीवर चालते. इंटरनेट हे केवळ एकच एकसंध असे नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्क्‍सनी बनलेले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविध प्रकारच्या माहितीची देवाण-घेवाण जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे ई-मेल, वर्ल्डवाईड वेब पेजेस्‌, लोकांशी गप्पा मारणे, इत्यादी. इंटरनेटच्या स्थापनेची मुळे खोल संशोधनात रुजलेली आहेत. इंटरनेटची लोकप्रियता इतकी वाढली की ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक बनले. इंटरनेटच्या वापरामुळे विचार आणि माहिती देवाण-घेवाण करता येते. सामान्य लोकांसाठी आधुनिक विज्ञान भेट आहे. कल्पना आणि माहितीच्या देवाण-घेवाणीच्या क्षेत्रात जगभर क्रांती घडवून आणली आहे. व्यवसायकर्ते इंटरनेटवरून आपला व्यवसाय अतिशय वेगाने विकसित करू शकतात. बरेच व्यापारी त्यांची उत्पादने ऑनलाइन विकतात. विद्यार्थी त्यांना आवश्‍यक शैक्षणिक माहिती मिळवू शकतात, नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, इंटरनेटद्वारे प्रतिमा आणि व्हिडिओ सामायिक करू शकतो. ऑनलाइन बातम्यांच्या वेबसाइट वाचू शकतो आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीविषयी अद्ययावत राहू शकतो. आम्ही इंटरनेटवर पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतो. लोक या स्तंभापासून त्वरित आणि कमी खर्चासाठी ई-मेल पाठवू शकतात. इंटरनेटद्वारा व्हॉट्‌सऍप, फेसबुक यामधील संवाद मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सोशल मीडियामुळे जनसंपर्क वाढून विविध व्यवसायात याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

विनायक लांडे

शहर प्रतिनिधी

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)