अहमदनगर: जिल्हाधिकाऱ्यांकडे मनपा आयुक्‍तांचा प्रभारी पदभार कायम ठेवा

सत्ताधाऱ्यांना सक्षम अधिकारी नको असल्याचा आरोप

नगर – महापालिका प्रशासनाला शिस्त लावून शहरात विविध विकासात्मक कामांना चालना देणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे असलेला मनपा आयुक्तांचा प्रभारी पदभार कायम ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडील मनपा आयुक्तांचा प्रभारी पदभार काढून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचे समजताच, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार सुनील पाखरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. विकासाला चालना देणारे प्रभारी आयुक्त द्विवेदी यांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठामपणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी उपमहापौर दीपक सूळ, संजय झिंजे, सुरेश बनसोडे, साहेबान जहागीरदार, संभाजी पवार, नीलेश बांगरे, वैभव ढाकणे, प्रकाश भागानगरे, सारंग पंधाडे, अमित खामकर, जॉय लोखंडे, गुड्डू खताळ, संजय सपकाळ, अमित औसरकर, मारुती पवार, लकी खुबचंदानी, वैभव जाधव, अरुण खिची, शुभम बंब आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या रूपाने पहिल्यांदाच धडाकेबाज सक्षम आयुक्त मिळाला आहे. महापालिकेच्या गलथान कारभाराला शिस्त लावून शहराच्या विकासात्मक कामांना चालना मिळाली आहे. गलथान कारभाराविरोधात त्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने सत्ताधारी शिवसेनेने विकासाला आडवे येत प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा डाव आखला आहे. जिल्हाधिकारी यांनी सीना पात्रातील अतिक्रमण हटवून चालू असलेल्या महापालिकेच्या मनमानी कारभारावर अंकुश आणला आहे. कडक शिस्तीच्या प्रभारी आयुक्तांमुळे सत्ताधारी शिवसेनेला मलिदा खाण्यात अडचणी वाढल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला.

सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्यांना चांगला सक्षम अधिकारी नको असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शहराचा विकास झाल्यास शिवसेनेच्या भूलथापांना व संरक्षणाच्या मुद्याला किंमत राहणार नाही. शिवसेना नेहमीच शहर विकासाच्या विरोधात उभी राहिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस विकास कामांसह जिल्हाधिकारी यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार असून, त्यांना आयुक्त पदावरून हटविण्याचा प्रयत्न झाल्यास नगरकरांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)