अहमदनगर: आनंद मेळाव्यात 36 शाळांचा सहभाग

लामखडे – जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता उत्कृष्ट

नगर – जिल्हा परिषद मराठी शाळांची गुणवत्ता आजही इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा अधिकच आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणे सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्‌या परवडणारे नाही. मातृभाषेचे संगोपन मराठी माध्यमांत अधिक गतीने होते. मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण देण्यात येत असून, सर्वसामान्य पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवावे, असे प्रतिपादन जि. प. सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.

निंबळक गटातील चास येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बाल आनंद मेळाव्याचे उध्दघाटन जि. प. सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती रामदास भोर, पं.स. सदस्य दिलीप पवार, सरपंच अनिता गायकवाड, उपसरपंच दीपक कार्ले, डॉ. सुनील गंधे, विस्तार अधिकारी मेढे, केंद्रप्रमुख भोसले, शेख, जाधव, तुकाराम थिटे, शोभाताई पवार, सुमेधा शेजूळ, खुदाबक्ष सय्यद, अंबादास गारुडकर, संतोष कार्ले, देवकर सर, चंद्रकांत गोसावी, आबा लोंढे, प्रकाश नांगरे, नारायण पिसे, विजय ठाणगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना लामखडे पुढे म्हणाले की, निंबोडी शाळेची दुखद घटना पाहता शिक्षकांनी आपल्या शाळांचा बांधकामाचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवावा. जेणेकरून शाळांच्या समस्या सुटण्यास प्राधान्य देता येईल. त्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करू. शिक्षक-शिक्षिका यांचा मेळावा येणार्या काळात घेण्यात येईल. यावेळी शिक्षक-शिक्षिकांवर असणारा मानसिक ताणतणाव या मेळाव्याच्या माध्यमातून काही अंशी सुटण्यासाठी प्रयत्न करता येतील, असे सांगितले.

यावेळी बोलतांना सभापती रामदास भोर म्हणाले , आनंद मेळाव्याच्या माध्यमातून बालगोपाळांचे अविष्कार उत्स्फूर्तपणे पाहावयास मिळत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासण्याचे काम होत आहे. मुलांना नुसती पुस्तकी ज्ञान न देता अवांतर ज्ञान मिळण्याची गरज आहे. यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले.
चास, अकोळनेर, हिंगणगाव, निंबळक, अरणगाव या केंद्रांतर्गत एकूण 36 शाळांनी या बालआनंद मेळाव्यात सहभाग घेतला. या मेळाव्यात सुमारे 3000 विद्यार्थ्यांसह 128 शिक्षक सहभागी झाले होते. 50 विविध प्रकारचे स्टॉल हे या मेळाव्याचे वैशिष्ट्‌य ठरले. मेळाव्यास भेट देणाऱ्या प्रत्येकास त्यामुळे आनंद मिळाला. हिवरेबाजार शाळेच्या स्काऊट व गाईड व सोनेवाडीच्या लेझिम पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)