अस्सल पुण्याची संस्कृती आणि किस्स्यांमध्ये रमला श्रोतृवर्ग

पुणे  – आळंदी-देहूचे शेजार लाभलेले संतांचे, शिवरायांच्या मावळ्यांचे, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकांचे, मनाला भिडणाऱ्या कविता करणाऱ्या कवींचे आणि संगीत रंगभूमीसह बॉलिवुड गाजविणाऱ्या कलाकारांचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या अस्सल मराठमोळ्या संस्कृतीसह पुणेरी किस्से अनुभविण्यात श्रोतृवर्ग रमला. पुणेरी पुणेकरांचे किस्से, त्यांचे जगभरात पोहोचलेले कर्तृत्व आणि दातृत्व साहित्य, कला, नृत्य, नाटयाच्या माध्यमातून रंगमंचावर सादर झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये श्रीरंग गोडबोले यांची संकल्पना असलेला पुणेरी पुणेकर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पुण्यासह महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीवर आपली कला सादर करणा-या अनेक दिग्गज कलावंतांनी सादरीकरण केले.
गणेशवंदना आणि पंचतुंड नररुंड मालधर… या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीत रंगभूमीवर बालगंधर्वांनी अधिराज्य गाजविले. त्यांना मम आत्मा गमला…वद जावू कुणाला शरण गं… खरा तो प्रेमाला धरी…अशा विविध रचनांतून अभिवादन करण्यात आले. प्रभात फिल्म कंपनीची गाजलेली तुतारी दुमदुमली आणि दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव… कशाला उद्याची बात… लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… या अजरामर गीतांवर मनोहारी नृत्यसादरीकरण झाले. अस्सल खवैयांचे शहर म्हणून पुण्याची ओळख. त्यामुळे पुण्यातील खाद्यभ्रमंती देखील यावेळी रसिकांना घडविण्यात आली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मोहुनिया तुज संगे, नयन खेळले जुगार… बुगडी माझी सांडली गं… अशा एकाहून एक सरस रचना सादर झाल्या. पु.ल.देशपांडे, ग.दी.माडगूळकर, पं.भीमसेन जोशी या दिग्गजांना यावेळी सादरीकरणातून अभिवादन करण्यात आले. माझे माहेर पंढरी… इंद्रायणी काठी… या भक्तीगीतांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. शर्वरी जमेनीस यांनी सादर केलेल्या शिवतांडव नृत्य उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि 21 व्या शतकातील पुण्यामध्ये झालेले चांगले-वाईट बदल यावेळी कलाकारांनी सादर करीत पुणेकरांची पुणेरी पद्धतीने मने जिंकली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)