अस्वस्थता वाढत आहे….. 

अशोक सुतार 

सामान्यांचा विकास करण्याऐवजी सध्या सत्ताधाऱ्यांकडून सांप्रदायिकतेला पाठबळ दिले जात आहे. शेतकरी, वंचित घटक व स्त्रियांच्या विकासासाठी सत्तेचा कुशलतेने वापर केला जात नाही. या सांप्रदायिक विचारांविरोधात बहुजन विचारसरणीच्या सर्वांचे संघटन होणे आवश्‍यक आहे. हे काम संघर्षमय आहे. या मातीतील क्रांतिकारक बीजे व सर्व समाज घटकांना सोबत नेण्याचा विचार म्हणजे शाहू-फुले- आंबेडकरांचे विचार. या विचारांचा लढा देशातील युवकांनी, पुरोगामी, पक्षांनी एकत्रित येऊन लढणे आवश्‍यक आहे. 

देशात सर्वसामान्यांचा विकास करण्याऐवजी सध्या सांप्रदायिकतेला पाठबळ दिले जात आहे. शेतकरी, उपेक्षित घटक व स्त्रियांच्या विकासासाठी सत्तेचा वापर केला जात नाही. मागासवर्गीय समाजाचे खच्चीकरण करण्यापेक्षा दुसरा कुठलाही हेतू कट्टरतावाद्यांकडे राहिलेला नाही. यामुळे भारतीय संविधानाला बगल देण्याचा डाव जातीवाद्यांनी सुरू केल्याचे दिसत आहे. या सांप्रदायिक विचारांविरोधात बहुजन विचारसरणीच्या सर्वांची संघटना करणे आवश्‍यक आहे. हे काम संघर्षमय आहे; परंतु बहुजन समाज सांप्रदायिकतेच्या विरोधात पुढे आला तरच लोकशाही मूल्ये सुरक्षित राहतील. अन्यथा पुन्हा एकदा देश अंधारयुगात जाण्याची चिन्हे दिसत आहेत. या मातीतील राष्ट्रपुरुषांनी रोवलेली क्रांतिकारक बीजे आपण फुलविल्याशिवाय देश सुजलाम सुफलाम होणार नाही. भारतभूमीच्या मातीत क्रांतीची बीजे आहेत. स्वराज्यनिर्मिती असो किंवा ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा यावर आपल्या पूर्वजांनी लढा दिला आहे, त्याचा एक इतिहास निर्माण केला आहे.

प्रत्येक काळात इथला सर्वसामान्य माणूसच सर्व सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभा ठाकला असल्याचे दिसते. बहुजन समाजातील सर्वांना सोबत घेतले पाहिजे, समाजातील शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेचा वापर केला गेला पाहिजे. पण आता असे होताना दिसत नाही. देशात गेल्या तीन वर्षांत कट्टरतावाद वाढत आहे. सध्या सर्वसामान्य माणसांत प्रचंड अस्वस्थता आहे. तथाकथित गोरक्षकांच्या झुंडी धर्माच्या नावाखाली देशातील मागासवर्गीय समाजाला त्रास देऊन धुमाकूळ घालत आहेत. कट्टर सांप्रदायिक विचाराला पाठबळ दिले जात आहे. महागाई व मंदीचे सावट देशावर आहे. शेतीची अर्थव्यवस्था संकटात आहे; पण शासनकर्त्यांना त्याची चिंता नाही. सर्वत्र विकासाचा जयघोष होत आहे; पण कुणाचा विकास? काही मूठभर लोकांचा विकास म्हणजे देशाचा विकास नव्हे. तळागाळातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा विचार सत्ताधाऱ्यांकडून होत नाही, ही चिंतेची बाब आहे. देश डिजिटल करण्याची घोषणा वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत.

पण डिजिटल म्हणजे तरी काय, याची व्याख्या सत्ताधाऱ्यांना अजूनही समजलेली नाही, असे खेदाने नमूद करावे लागत आहे. शेतकऱ्याला उद्‌ध्वस्त करून परदेशी कंपन्यांना रान मोकळे करणे व त्यांना विविध सवलती देणे, मुठभर भांडवलदारांना बेलआउट पॅकेजेस देणे म्हणजेही विकास नव्हे. देशातील सत्ताधाऱ्यांचे समर्थक पुन्हा पुन्हा राममंदिर बांधण्याचा विषय कोळसा उगाळावा असे उगाळत आहेत. जागतिक भूक निर्देशांकांत भारताचा नंबर 110 वा आहे, असे असताना लोकांना रामाची नाही तर रोटीची अत्यावश्‍यकता आहे. देश जागतिक भूक निर्देशांक यादीत 110 व्या स्थानावर असल्याची कुणा सत्ताधारी नेत्यांना चाड वाटत नाही, उलट आम्ही कसे इतर देशांपेक्षा खालून वरच्या रांगेत आहोत याची टिमकी वाजवताना दिसतात. देशात किती लोक दररोज उपाशी राहतात, किती लोकांचा सांप्रदायिक झुंडीने बळी घेतला, अल्पसंख्याकावर जुलूम होतो आहे का, असले विषय सत्ताधाऱ्यांसमोर दिसत नाहीत. त्यांना तसा कधी प्रश्‍न पडत नाही.

शेतकऱ्यांसाठी, समाजातील उपेक्षित घटक व स्त्रियांच्या सक्षमतेसाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेतून मिळालेल्या अधिकारांचा वापर केला पहिजे, असे वाटते. परंतु, देशात मुली, स्त्रियांवरील वाढता अत्याचार यावर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत. 12 वर्षापर्यंतच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने काढला; पण सर्व स्त्रियांबाबत केंद्र सरकारला हाच नियम का लागू करावासा वाटला नाही, हा एक गहन प्रश्‍न आहे. सांप्रदायिक विचारांचा बीमोड करण्यासाठी बहुजन विचारसरणीचे राजकीय पक्ष, युवक, संस्था, संघटना, जागृत नागरिकांनी एकत्र येऊन देशातील सर्वांची संघटना उभी करणे आवश्‍यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष देशात समता-बंधुभाव-न्यायासाठी झटले.

त्यांचा आदर्श ठेवून सर्वव्यापक लोकांच्या सर्वकष प्रगतीसाठी झटणारे सत्ताधारी देशासाठी आवश्‍यक आहेत. नव्या पिढीने देशातील बदलाचा सम्यक विचार करून देशात लोकशाही विचारांची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्‍यक आहे. देशात सांप्रदायिकता वाढत असल्याची अनेक उदाहरणे देता येतील. गुजरातमधील उना येथे दोन वर्षांपूर्वी चार दलित युवकांना गाईंचे मांस व गाईंची वाहतूक केल्याच्या कारणावरून तथाकथित गोरक्षकांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. ही मारहाण सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली होती, त्यामुळे तेथील दलित वर्गात प्रस्थापितांविरोधात असंतोष भडकला. उना येथील घटनेचे पडसाद फक्‍त गुजरातमध्येच उमटले असे नाही तर ते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी उमटले होते. हे प्रकरण राज्य वा केंद्र सरकारला हाताळणे जमले नाही. आत्ताही ऍटॉसिटीच्या विषयावर देशात सर्वत्र अशांतता माजली होती. परिणामी, अल्पसंख्याक वर्ग रुष्ट झाला. यानिमित्ताने देशात सांप्रदायिकता वाढीस लागून देशात अस्वस्थता वाढत आहे, ती थांबणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)