असहकार पुकारल्यानंतर राज्य शासनाला जाग

होमगार्ड जवानांचा उतरविण्यात येणार विमा : अंमलबजावणीचे आदेश

पुणे – पोलिसांचा मित्र आणि समाजाचा रक्षक समजल्या जाणाऱ्या होमगार्ड जवानांनी ऐन गणेशोत्सवाच्या काळात असहकार पुकारल्यानंतर राज्य शासनाला अखेर जाग आली आहे. या जवानांचा विमा उतरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या जवानांना या योजनेचा गेल्या पाच वर्षांपासूनचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये मयत आणि जखमी झालेल्या जवानांची माहिती तातडीने देण्याचे आदेश होमगार्डच्या सर्व कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यासाठी एका महिन्याची डेडलाईन देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शहरी आणि ग्रामीण भागांतही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढत आहे. मात्र, हे नागरीकरण वाढत असतानाच पोलिसांची संख्या अपेक्षित वाढलेली नाही. हे वास्तव असतानाच गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या गुन्हेगारीला आळा घालताना आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असते. विशेष म्हणजे गणेशोत्सवासह अन्य सण अथवा अन्य काळात बंदोबस्त पुरविताना पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यावर उपाय म्हणून होमगार्ड दलाची स्थापना करण्यात आली आहे. या जवानांनी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य जनतेचे रक्षण केले आहे. हे वास्तव असतानाही राज्य शासनाने आतापर्यंत त्यांची आर्थिक अवहेलनाच केली आहे.

हे जवान बंदोबस्ताच्या कालावधीत तब्बल बारा ते तेरा तास बंदोबस्त करत असतात. विशेष म्हणजे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतानाही त्यांना आहार भत्त्यासह अवघे चारशे रुपयांचे मानधन मिळत असते. त्याशिवाय बंदोबस्त असला तरच त्यांना या मानधनाचा लाभ मिळत असतो. त्याशिवाय बंदोबस्त संपल्यानंतर हे मानधन मिळविण्यासाठी त्यांना संबंधित कार्यालयात चार ते पाच महिने हेलपाटे मारावे लागतात. त्याशिवाय बंदोबस्तावर असल्यावर काही दुर्घटना घडल्यास त्यांच्या वारसांना कोणताही लाभ मिळत नव्हता. या सर्व आर्थिक विवंचनेमुळे हा जवान अक्षरश: हतबल झाले आहेत. हे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी होमगार्डच्या संघटनांनी आतापर्यंत शासन दरबारी प्रयत्न केले. मात्र, शासनाला जाग आली नव्हती. त्यामुळे होमगार्डच्या संघटनांनी ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत राज्य शासनाशी असहकार पुकारत बंदोबस्तावर बहिष्कार टाकला होता. परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्याची गंभीर दखल घेत राज्याचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. होमगार्ड दलाचे महासमादेशक संजय पांडे यांच्यासह होमगार्ड संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार होमगार्डच्या जवानांना या विम्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती होमगार्ड दलाचे शहर समादेशक उत्तमराव साळवी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)