असली गारपीट नको रे बाप्पा !

टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल ग आई, चल ग आई, पावसात जाऊ
टीव्हीवर गाणे लागले होते. त्या टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू’ने मला माझ्या आजीच्या घराची आठवण झाली. घर खूप मोठे होते, पण वर पत्रे टाकलेले असल्याने पाऊस पडायला लागला की पत्र्यावर संगीत सुरू होई आणि कधी गारा पडायला लागल्या तर बघायलाच नको; ताशा वाजवल्यासारखा ताड ताड आवाज यायचा पत्र्यांचा. केवळ पत्र्यांच्या आवाजाने गारा पडत आहेत हे समजायचे. मग गारा गोळा करायला सारी छोटी कंपनी बाहेर पडत असे. गारा गोळा करण्यासाठी प्रत्येकाची वेगळी “आयडिया’ असायची. जमिनीवर पडलेल्या गारा वेचून घेणे हा सर्वात सोपा आणि म्हणूनच कोणालाही न आवडणारा प्रकार. मग कोणी हाताची ओंजळ समोर धरून त्यात पडलेल्या गारा खात असे वा जास्त आल्या तर जमा करत असे. मुलांनी शर्ट पसरून वा मुलींनी फ्रॉकच्या ओच्यात गारा गोळा करणे हा आणखी एक साधा सोपा उपाय. पातेल्यात गारा गोळा करता येत, पण त्यात गारांपेक्षा पाणीच जास्त जमा होई, त्यामुळे तो प्रकार काही फारसा आवडत नसे. उघडलेली छत्री उलटी करून तिच्यात गारा गोळा करणे हा सर्वात आवडता, पण मोठी माणसे छत्री देत नसल्याने काहीसा कठीण प्रकार. त्यांची नजर चुकवून कोणी छत्री आणलीच तर मात्र भरपूर गारा मिळत. नुसत्या गारा. कारण छत्रीतून पाणी गळून जाई आणि नुसत्या गारा राहात. त्या कडकडा चावून खाण्यात काय मजा येत असे, वा! सांगता सोय नाही. गारांचे आकार तेव्हा वाटाण्याएवढे, शेंगदाण्याएवढे असत. क्वचित कधीतरी एखादी गार सुपारीएवढी मिळत असे. मग ती कौतुकाने एकमेकांना दाखवण्यातच अर्धी निम्मी विरघळून जात असे. कधी कधी खूप गारा मिळाल्यातर पाण्याच्या हंड्यात टाकायचो आम्ही. त्यामुळे मग हंड्यातले पाणी थंड होई. माझा एक मामा होता. आईचा सर्वात लहान भाऊ. मोठ्या गमत्या होता तो. कलाकार होता, कसरतपटू होता. अंगणात हातावर चालून दाखवत असे तो. कधी अगदी पैज लावून गारा पडताना तो “आ’ करून पडणारी गार बरोबर तोंडात झेलत असे. कधी एखादी गार नाकावर आपटायची त्याच्या. पण ते तो हसून घालवायचा.
लहानपणी गारा म्हणजे केवळ आनंद असे. पावसात भिजण्याचा आनंद, गारा गोळा करण्याचा आनंद आणि त्या खाण्याचाही आनंद. पुढे शाळेत जायला लागल्यावर गारा कशा तयार होतात हे समजले. मोठ्या गारा तयार झाल्या तरी त्या वातावरणातून खाली येईपर्यंत खूपच बारीक होतात हे समजले आणि बारीक होतात म्हणूनच त्यांचा आनंद आपल्याला मिळतो हे ही समजले. आता मात्र गारांचे दुसरी बाजू समजायला लागली आहे. पूर्वी कधीही समजलेली, न जाणवलेली बाजू. गारा पड्‌ल्या आणि गारपीट झाली या दोन वाक्‍यांत तो फरक समोर उभा राहतो. गारा म्हणजे आनंद असला, तर गारपीट म्हणजे नुकसान… शेतीचे नुकसान. गारपिटीने उभी पिके मोडून पडतात. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. फळांचे नुकसान होते. आता पेपरमध्ये वाचायला मिळते अधून मधून की अमूक भागात गारपीट झाल्याने पिकांचे एवढे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मग सरकार नुकसान भरपाईही जाहीर करते. दोन तीन वर्षांपूर्वी गारपिटीची आणखी एक त्रासदायक बाजू समोर आली होती. मोठ्या मोठ्या गारांचा पाऊस पडला होता तेव्हा आणि त्या गारांच्या माऱ्यामुळे असंख्य पक्षी जखमी झाले होते. काही पक्षिमित्र असे जखमी पक्षी आणून त्यांच्यावर उपचार करताना दाखवले होते.
अनेक पक्षी गारांच्या तडाख्याने मरण पावले होते. पडणाऱ्या मोठ्या गारा म्हणजे जणू बंदुकीच्या गोळ्याच. त्याहूनही पुढचा प्रकार गेल्या आठवड्यात व्हॉट्‌स ऍपवर पाहायला मिळाला. चांगला पाच मिनिटांचा व्हिडीयो आला होता व्हॉट्‌सऍपवर, प्रथम त्याचा काही अर्थच लागेना, पुन्हा निरखून पाहिल्यावर लक्षात आले, चांगल्या पेरूएवढ्या-आंब्याएवढ्या गारा पडत होत्या. अत्यंत वेगाने. तोफांचे गोळे सुटावेत तशा जमिनीवर आदळत होत्या जर त्यातली एखादी गार कोणाच्या टाळक्‍यात आपटली, तर कपाळमोक्षच व्हायचा. दुसऱ्या एका फोटोत नुसत्या गारांचे फोटो होते. बघूनच भीती वाटावी अशा मोठ्या गारा. मनात आले असली गारपीट नको रे बाप्पा !
– अश्‍विनी महामुनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)