असंतोषाचा जाळ; निष्क्रियतेचा धूर

डोळ्यांदेखत बसेस जळताना प्रशासन करतंय तरी काय? : प्रवाशांचा सवाल


पीएमपीएमएल’ चा प्रवास; धोका हमखास असल्याची भावना


550 बसेसचे सेफ्टी ऑडिटच नाही; आरटीओ मूग गिळून गप्प


वर्षानुवर्षे सर्व्हिंसिंग करण्याकडेही कानाडोळा

पुणे- सार्वजनिक वाहतूक बसेसचे दर सहा महिन्यांनी सेफ्टी ऑडिट बंधनकारक आहे. ते न झाल्यास अशा बसेस रस्त्यावर आणता येत नाहीत. मात्र, लाखो पुणेकर प्रवाशांची “लाइफलाइन’ असलेल्या “पीएमपीएमएल’ च्या तब्बल 550 बसेसचे सेफ्टी ऑडिटच झाले नसल्याचे समोर आले आहे. या बसेसचे वर्षानुवर्षे सर्व्हिसिंगही होत नसल्याचे स्पष्ट आहे. या हलगर्जीपणामुळे गेल्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत दहा बसेसचा डोळ्यांदेखत कोळसा होऊनदेखील प्रशासन गप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाऱ्यावर पडलाय का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही महिन्यांत पीएमपी बसेसला आगी लागण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला आरटीओ प्रशासनदेखील गेल्या काही वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारच्या एकाही बसेसवर दंडात्मक अथवा अन्य कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्यात आलेली नाही. पीएमपीएमएलच्या ताफ्यात खासगी ठेकेदारांसह स्वत:च्या मालकीच्या 1700 बसेस आहेत. त्यातील जवळपास 750 बसेसचे आयुर्मान संपलेले आहे. त्यामुळे नियमानुसार या बसेस मार्गावर पाठविता येत नाहीत. मात्र, धोका पत्करुन या बसेस मार्गावर पाठविण्यात येतात. तर, गेल्या कित्येक वर्षांपासून ताफ्यातील तब्बल 550 बसेसचे सेफ्टी ऑडिटच झालेले नाही. यात ठेकेदारांच्या बसेसचाही समावेश आहे.

गेल्या 15 महिन्यांत पीएमपीएमएलच्या ताफ्यातील तब्बल 10 बसेसने मार्गावर असतानाच पेट घेतल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि बसेसच्या सुव्यवस्थेचाही प्रश्‍न तितकाच ऐरणीवर आला आहे. या घटनांमध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु वित्तहानी होत असल्याने त्याचा भार प्रवाशांनाच सोसावा लागत आहे. अशा बसेसवर आरटीओचे नियंत्रण आवश्‍यक आहे. मात्र, अशा बसेसवर कारवाई झालेली नाही.

पीएमपीएमएलच्या बसेसला आगी का लागतात, याची कारणे शोधण्यासाठी यापूर्वीच प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार बसेसची तपासणी करण्यात येत आहे. यात मेन्टनन्स व्यवस्थित होत नसल्याने आगी लागत असल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल


प्रशासनाच्या कारभारामुळे बसेसला आग लागत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, प्रशासनाने त्याची दखलही घेतली नाही. बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठीही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे या कारभाराविरोधात आता नाईलाजाने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार आहे.
– जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपीएमएल प्रवासी मंच


धोकादायक बसेसची माहिती चालकांच्या वतीने प्रशासनाला वारंवार देण्यात येत आहे. त्याशिवाय या बसेस मार्गावर पाठविल्यास धोका निर्माण होऊ शकतो, हेदेखील सांगण्यात आले आहे. मात्र; केवळ महसुलासाठी या बसेस मार्गावर पाठविण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अट्टाहास असतो. त्यातूनच अपघातांना खतपाणी घातले जात असून प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.
राजेंद्र खराडे, अध्यक्ष, पीएमटी कामगार संघ (इंटक)

बसला आग लागण्याची प्रमुख कारणे
हजारो किलोमीटर होऊनही रेडियटर बदलले जात नाही
बसेसचे मेन्टनन्स वेळेवर होत नाही
वर्षानुवर्षे सर्व्हिंसिंग आणि ग्रिसिंगही बदली नाही
ऑइलची देखभाल होत नसल्याने लिकेज होउन आग लागण्याचे प्रमाण वाढते.
टायर आणि लायनरची देखभालच होत नसल्याने आगीच्या घटनांना खतपाणी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)