अष्टांग- योगाची आठ अंगे (भाग १)

सर्वेश शशी

अष्टांग- योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू:

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी, यात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्‍यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण आठ भागांत करण्यात आले आहेत. ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात. व्यक्‍तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्‍कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्‍यक आहेत. या अंगांमागील सार समजून घेऊ…

1.यम
यम म्हणजे योगसाधकासाठी असलेली नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे. यम पाच आहेत- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.

अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे                                                                      दुसऱ्या कोणाप्रती किंवा स्वत:प्रती केलेले कोणतेही हानी पोहोचवणारे, टीकात्मक ठरणारे, चीड आणणारे, राग आणणारे किंवा शिक्‍का मारणारे शारीरिक, भावनिक किंवा मानसिक कृत्य म्हणजे हिंसा. या खोल रुजलेल्या संकल्पनेची जाणीव साधकाला असली पाहिजे, त्याने ती समजून घेतली पाहिजे आणि सकारात्मक तसेच योगाभ्यास व समाजाच्या विकासात भर घालणारे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सत्य म्हणजे खरेपणा
योगसाधकाने कायम स्वत:प्रती तसेच इतरांप्रती खरे राहिले पाहिजे. सत्यतापूर्ण आयुष्य जगणे अनेकांना बरेचदा कठीण वाटते. मात्र, सत्याच्या पथावर चालत राहिल्यास मानाचे, आदराचे, संवेदनशील वर्तनाचे आयुष्य उभे राहते. असे आयुष्य योगसाधकासाठी अत्यावश्‍यक आहे.

अस्तेय म्हणजे चोरी न करणे
याचा अर्थ आपल्या मालकीचे नाही ते आपण घेऊ नये. यात केवळ भौतिक स्वरूपाच्या चोरीचा समावेश होत नाही, तर मानसिक स्तरावरील चोरीही यात येते. म्हणजेच चोरीचा विचारही मनातून काढून टाकला पाहिजे. याचा अर्थ आपण आपल्या लाभासाठी कोणाची मन:शांती किंवा आनंद हिरावू नये असाही होतो.

ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम
याची मदत होते ती आपली व्यसने व टोकाच्या सवयींचे बंध तोडण्यामध्ये. यासाठी धैर्य आणि इच्छाशक्‍तीची गरज भासते. मनात दाटलेल्या ऊर्मीवर प्रत्येक वेळी मात करताना, आपण अधिक बळकट, अधिक निरोगी आणि अधिक शहाणे होत जातो.

अपरिग्रह म्हणजे लोभ सोडणे
याचा अर्थ आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरित्या, मानसिकरित्या व भावनिकरित्या त्याग करणे. यामुळे व्यक्‍तीला साधे आयुष्य जगण्यात मदत होते.

2.नियम
नियम हा रूपांतरणाच्या साधनांचा एक शक्‍तिशाली संच आहे, स्वत:चे निरीक्षण करून स्वत:बद्दल अधिकाधिक जागरूक होण्यासाठी आपल्यातच असलेला एक आरसा आहे. नियमाच्या पाच शाखा आहेत- सौच, संतोष, तापस, स्वाध्याय आणि इश्‍वरप्रणिधान

सौच: हे वातावरणाचे अंतर्गत व बाह्य शुद्धीकरण आहे. आपल्यामध्ये व आपल्या आजूबाजूला कशामुळे अशुद्धी निर्माण होते ते शोधून त्याचा नाश करण्याचा हा मार्ग आहे. यामध्ये अन्नपदार्थ, पेये, मित्र, मनोरंजन, घरातले सामान, वाहतुकीची साधने या सर्वांचा समावेश होतो.

संतोष: यामध्ये समाधान, आत्मविश्‍वास आणि आयुष्यातील स्थैर्याची भावना दाखवली जाते. समाधानी राहता आले तर आपली हाव कमी होते, आपल्या लालसा आणि गरजा कमी होतात. याऐवजी हा नियम आपल्यात कृतज्ञतेची भावना निर्माण करतो, आपल्याला आयुष्यात ज्याची देणगी मिळालेली आहे ते प्रेम व आनंद जागवतो.

तापस: तापस हा स्वयंशिस्तीचा आणि हिंमतीचा सराव आहे. यामुळे आपल्याला आपल्या हानीकारक ठरू शकेल अशा भावनावश वर्तनावर नियंत्रण ठेवता येते आणि विजय मिळवता येतो तसेच जागृतावस्था साध्य करण्यात मदत होते.

स्वाध्याय: स्वाध्याय म्हणजे स्वत:चा अभ्यास करणे. यामध्ये आपण या क्षणात आणि त्या पलीकडे कोण आहोत हे बघण्याची गरज भासते. हा स्वत:चा, स्वत:च्या कृतींचा आणि विचारांचा अभ्यास आपल्याला स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यात तसेच स्वत:चे अधिक चांगले स्वरूप साध्य करण्यात मदत करतो.

ईश्‍वरप्रणिधान: याचा अर्थ आहे एकनिष्ठता आणि दिव्यत्वाला शरण जाणे. आपण आपला अहंकेंद्री स्वभाव विरघळवून टाकला पाहिजे आणि स्वत:शीच सतत तादात्म्य पावणेही सोडून दिले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)