अष्टविनायक दर्शनासाठी गेलेली मिनीबस थेऊरजवळ उलटली

लोणी काळभोर -अष्टविनायक दर्शनासाठी चाललेल्या मिनी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावर बस उलटल्याने झालेल्या अपघातात पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिक जखमी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात थेऊर फाटा ते थेऊर गाव या दरम्यानच्या रस्त्यावर, गाढवेवस्ती नजिक झाला. या संदर्भात पत्रकार संदेश धोंडीराम पुजारी (वय 36, रा. बोरा पार्क, पिंपळे सौदागर, पिंपरी) यांनी फिर्याद नोंदविली आहे. संदेश पुजारी हे पत्नी, दोन मुले व शेजारील पाच कुटुंब आपल्या मुलांसह अष्टविनायक यात्रेसाठी निघाले होते. बसमध्ये लहान मुलांसह एकूण वीस जण होते. त्यापैकी पंधरा जण जखमी झाले आहेत.
मोरगावला दर्शन घेऊन हे सर्वजण थेऊरकडे निघाले होते. त्यांची मिनी बस थेऊर फाट्यावरून थेऊर गावाकडे निघाली होती. सकाळी साडेदहा वाजता बस गाढवेवस्ती जवळच्या वळणावर चालक बालाजी पांडुरंग मुंढे (रा. काळेवाडी, पिंपरी) याचा बसवरील ताबा सुटल्याने बस डाव्या बाजूला उलटली. त्या वेळी गाडीचे तोंडविरुद्ध दिशेला झाले. बसमधील बहुतेक सर्वांना मार लागला. तेथे जमलेल्या नागरिकांनी व हवालदार बाळासाहेब गव्हाणे, लोकेश राऊत या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात बहुतेक जखमींना हात पाय, खांदा, डोके, या ठिकाणी मार लागला आहे. किरकोळ जखमींना उपचारा नंतर घरी सोडण्यात आले. उर्वरित जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास हवालदार बाळासाहेब गव्हाणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)