अष्टपैलू नेतृत्त्वाची करुणाअखेर!

करुणानिधी यांची ओळख फक्त एक राजकारणी आणि चित्रपट कलावंत एवढीच नाही, तर ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. पाच वेळा मुख्यमंत्री झाले, म्हणून त्यांचे राजकीय महत्त्व नाही, तर एकाचवेळी शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या परस्परविरोधी विचारांच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. राष्ट्रीय राजकारणात त्यांना महत्त्व होते, म्हणूनच त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेन्नईला धाव घ्यावी वाटली. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षा (द्रमुक) चे सर्वेसर्वो आणि तमीळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तमीळनाडूच्या जनसामान्यांचे अमाप प्रेम मिळवलेल्या एम. करुणानिधी यांनी राजकारणासोबतच कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. साहित्य क्षेत्राकडे त्यांचा जास्त कल असल्यामुळे चित्रपटविश्वात त्यांनी पटकथालेखक म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्या लेखन कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी प्रत्ययकारी पटकथा लिहिल्या आणि त्यातून अतिशय महत्त्वाचे संदेशही जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. विधवा पुनर्विवाह, जमीनदारीची प्रथा पूर्णपणे बंद करण्याची मागणी, धर्माच्या नावाखाली होणारी दुष्कृत्ये, अस्पृश्‍यता निवारण, शोषित जनतेला दिलासा देणाऱ्या पटकथांवर त्यांनी भर दिला. ते नास्तिक होते; परंतु त्यांना त्यांच्या अनुयायांनी मात्र देवत्त्व बहाल केले होते. पराशक्ती या चित्रपटातून त्यांनी ब्राह्मण समाजातील काही नकारात्मक बाजू मांडल्या होत्या. हा चित्रपट तमिळी चित्रपटसृष्टीला एक वेगळे वळण देऊन गेला होता. त्यातून द्रविड चळवळीचा उदय झाला. “पानम’ आणि “तंगराथनम’ या चित्रपटांसाठीही त्यांनी अशाच समर्पक पटकथा लिहिल्या होत्या. चौकटीबाहेरच्या विचारसरणीमुळेच तत्कालीन पटकथाकारांच्या यादीत करुणानिधी अग्रस्थानी राहिले होते. राजकारणाबरोबरच त्यांचे अनेक क्षेत्रात मोठे योगदान होते. ते उत्तम लेखक होते आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तमीळ साहित्यामध्ये त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली होती. कविता, पत्र, कथा, चरित्र, कादंबऱ्या, ऐतिहासिक कादंबऱ्या, पटकथा, चित्रपट गीते, चित्रपटाचे संवाद असा मोठा ऐवज त्यांनी लिहिला आहे. थिरुकुरालसाठी त्यांनी कुरालोविआम, थोलकाप्पिया पुंगा, पुंबुकर याबरोबरच त्यांनी कविता, निबंध आणि अनेक पुस्तकेही लिहिली. 2014 मध्ये तामिळनाडूच्या विधानसभेतून बाहेर पडताना त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी खंत व्यक्त केली होती. तमीळनाडूच्या विधानसभेत आपल्यासारख्या अपंग व्यक्तीला बसण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली नसल्याचे म्हणत त्यांनी विधानसभेतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. साहित्याबरोबर करुणानिधी यांनी कला आणि स्थापत्यशास्त्रामार्फत तमीळ भाषेसाठीही योगदान दिले. कन्याकुमारीमध्ये त्यांनी विद्वानांचा सन्मान करण्यासाठी कन्याकुमारी येथे 133 फुटांचा तिरुवल्लुवरचा पुतळा उभारला. त्यांची पुस्तके आणि कवितासंग्रह मिळून एकूण शंभराहून अधिक पुस्तके आहेत. करुणानिधी विद्यार्थिदशेत असताना “पानागल अरासर’ या अभ्यासक्रमातील पुस्तकाने ते प्रभावित झाले होते. “द्रमुक’चे पूर्वसुरी असलेल्या “जस्टिस पार्टी’चे संस्थापक पानागल अरासर यांचे ते चरित्र. करुणानिधींनी या पुस्तकातूनच राजकारणाची मुळाक्षरे गिरवली. चौदाव्या वर्षीच हिंदीविरोधी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. अण्णादुराईची ओजस्वी भाषणे ऐकलेल्या करुणानिधींनी “सेल्फ रिस्पेक्‍ट मूव्हमेंट’वरील चर्चेत सहभागी होत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. “सेल्फ रिस्पेक्‍ट’च्या युवा आघाडीचेही ते सुरुवातीचे सदस्य होते. आठव्या इयत्तेतच त्यांनी राजकारणात “एंट्री’ केली. राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यातील शाळांमध्ये हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाविरुद्ध करुणानिधी रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. करुणानिधी 1952 मध्ये कुलिथालाई मतदारसंघातून विधानसभेवर सर्वप्रथम निवडून गेले. त्यानंतर 2016 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या गळ्यात सतत विजयाची माळच पडली. 1971 मधील विधानसभा निवडणुकीत द्रमुकने 234 पैकी 184 जागांवर विजय मिळविला. पक्षाच्या या सर्वांत मोठ्या विजयाने करुणानिधींच्या नेतृत्वावरही एक प्रकारे शिक्कामोर्तब केले. द्रमुकच्या विजयात एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांची भूमिका महत्त्वाची असली, तरी राजकीय धोका लक्षात घेऊन करुणानिधींनी त्यांना पक्षातून निलंबित केले. राजकारणात करुणानिधींची ही खेळी चुकीची समजली जाते. एमजीआर यांनी अखिल भारतीय अण्णाद्रमुक या पक्षाची स्थापना केली. 1977 च्या तसेच पुढील विधानसभा निवडणुका जिंकत एमजीआर 1987 पर्यंत म्हणजे निधनापर्यंत मुख्यमंत्री राहिले. या दहा वर्षांच्या काळात करुणानिधींनी आपल्या पक्षाची मोट कौशल्याने सांभाळली. एमजीआर यांच्या निधनानंतर करुणानिधींनी पुन्हा झेप घेतली. त्यांनी 1989 मध्ये मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रीक साधली. आयुष्याच्या उत्तरार्धात तमीळ राजकारणातील हा नेता एम. के. स्टॅलिन आणि एम. के. अळगिरी या आपल्याच पुत्रांमधील शत्रुत्वामुळे जर्जर झाला. त्यांच्या निधनांतरही त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वाद झाला. राज्य सरकारने मरिना बीचवरील जागा द्यायला नकार दिला. करुणानिधी यांचे नातेवाइक, राहुल गांधी तसेच त्यांच्या समर्थकांनी जयललिता यांच्या शेजारील जागा द्यायची मागणी केली. त्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. उच्च न्यायालयाने मरिना बीचवरील जागा द्यायचा आदेश दिल्याने वादावर पडदा पडला. जयललिता व करुणानिधी या दोघांच्या एक वर्षाच्या अंतराने निधन झाल्याने आता तमीळनाडूतील राजकारण वेगळे वळण घेण्याची शक्‍यता आहे. अण्णाद्रमुक व द्रमुक अशा दोन्ही परस्परविरोधी पक्षांकडे आता राज्यव्यापी ताकदीचे नेते नाहीत. रजनीकांत आणि कमल हसन यांनी राजकीय पोकळी भरून काढण्याचे ठरविले आहे. दोघांची गोपनीय भेट त्यादृष्टीने महत्त्वाची आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)