अवैध वाहतुकीमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्‍यात

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : लिफ्ट देणे पडतेय महागात

चिंचवड – गेल्या काही दिवसांमध्ये पुणे-बंगळूर महामार्गावर वाहन चालकांना लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. त्या घटनांचा तपास करत असताना अवैध आणि बोकाळलेली खासगी वाहन चालकांची मक्तेदारी कारणीभूत ठरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अशा अवैध वाहन चालकांवर वाहतूक, स्थानिक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून एकत्रित कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात पुणे-बंगळूर महामार्गावर लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. नेहरूनगरला लुटमारीला विरोध केल्यामुळे माजी सैनिकावर चोरट्यांनी सशस्त्र हल्ला चढवला होता. तसेच, पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी येणाऱ्या खासगी वाहनामध्येही लुटमार, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चिंचवड ते मुंबई आणि वाकड ते मुंबई या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी शेकडो वाहने आहेत. त्यातील अनेक वाहने पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.

या वाहनांवर गुंड प्रवृत्तीचे चालक म्हणून असल्याने त्यावर कोणीही आक्षेप घेत नाही. त्यावर कारवाईचा केवळ दिखावा केला जातो. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर अवैध वाहतूक सुरू असते. मात्र, त्यावर कारवाई करण्यास कोणीही वाहतूक कर्मचारी पुढे येत नाही. पूर्वी ही वाहने एकाच जागी असत. मात्र, आता ती वाहने एका ठिकाणी न थांबता फिरती ठेवतात. त्यामुळे सहज कोणाच्या लक्षात येत नाही. या प्रवासी वाहन चालकांची आसन क्षमता सहा ते सात आहेत. मात्र, त्यात दहा ते बारा प्रवासी दाटीवाटीने बसवले जातात. जलद प्रवास होईल,

या हेतून अनेकजण या अवैध प्रवासाचा पर्याय अवलंबतात. त्या वाहनाची स्थिती चांगली नसते. मोडक्‍या आणि जीर्ण झालेल्या वाहनातून प्रवाशांना घेऊन धोकादायक प्रवास केला जातो. अनेकदा चालकाला बसण्यासाठी जागा नसते. अशा वेळी एखादा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. चिंचवड स्टेशन, वाकड येथे थांबलेल्या एंजटामार्फत ते खासगी वाहन भरले जाते. मात्र, त्यानंतर ते वाहन कोणते व कोणाची याची कोणालाच माहिती नसते. जादा पैसे कमवण्याच्या नादात हे वाहन दिवसं-रात्रं सुरू असते. त्यामुळे पुरेशी झोप न घेता वाहन चालक हे स्वत:सहीत प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)