अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ड्रोनने चित्रिकरण

वर्षभरात अवैध वाळू उपसाचे 1830 प्रकरणे उघडकीस


22 कोटी रुपयांचा दंड वसूल

नागपूर – राज्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच परराज्यातून महाराष्ट्रात वाळू वाहतूक होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात अवैधपणे होत असलेल्या वाळू उपशासंदर्भात आमदार विलास तरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्री बोलत होते. ते म्हणाले, वर्षभरात संपूर्ण राज्यात अवैध वाळू उपसाचे 1830 प्रकरणे उघडकीस आले असून त्या माध्यमातून 22 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शासकीय बांधकामे वाळूशिवाय थांबून राहू नयेत याकरिता स्वतंत्र साठा ठेवण्यात आला असून हाच नियम सहकारी संस्थांच्या कामांनाही लागू करण्यासाठी विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात येईल. तसेच व्यक्तीगत बांधकाम करताना दोन ब्रास वाळू देण्याचे धोरण असून ती आता पाच ब्रास करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, अजित पवार, अनिल बाबर, डॉ. संजय कुटे यांनी सहभाग घेतला.

राज्यात वाळूचे परवाने देणे बंद केले नाही. मात्र, केंद्रीय पर्यावरण खात्याने या संदर्भात काही निर्बंध घातले असून वाहत्या पाण्यात यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा न करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्याऐवजी हात पाटीने उपसा करावा, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सांगितले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या परवानगीनुसार राज्यात 90 टक्के ठिकाणी वाळू उपसाची परवानगी देण्यात आली आहे, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

वाळूला पर्याय शोधण्याची गरज
नदींचे स्त्रोत आटत चालल्याने वाळूला पर्याय शोधण्याची आवश्‍यकता असून दगडाचा चुरा करुन तो वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मलेशिया येथे मोठ्या प्रमाणावर समुद्र किनारे असल्याने व तेथे वाळू उपसा संदर्भात फारसे निर्बंध नसल्याने मलेशियाहून वाळू आयात करण्याचा प्रस्ताव मिळाला असून त्या संदर्भात दोन वेळा बैठकादेखील घेण्यात आल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)