अवैध धंद्यांची “झिंग’!

  • पोलिसांचे दुर्लक्ष : दारू विक्री थांबविण्याची नागरिकांनी मागणी

वडगाव मावळ, (वार्ताहर) – सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य मार्गाच्या 500 व 220 मीटर हद्दीत मद्यविक्री बंद असताना मावळ तालुक्‍यातील पुणे-मुंबई महामार्गालगत घोरावडेश्‍वर ते लोणावळा दरम्यान राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर अनधिकृतपणे देशी व विदेशी दारू विक्री जोमात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांनी ढाब्यावर बसविले आहे. मावळ तालुक्‍यातील अवैधरित्या सुरू असलेली दारू विक्री थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली.

पुणे आणि मुंबई या दोन महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्‍यातील पुणे-मुंबई महामार्गालगत घोरावडेश्‍वर ते लोणावळा दरम्यान दुतर्फा मोठ्या प्रमाणात टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर दिवसाढवळ्या देशी व विदेशी दारू विक्री सुरू आहे. तसेच ग्रामीण भागातही अवैधरित्या दारू विक्री सुरू असून, बीट अंमलदार त्यांना संरक्षण देत आहेत. त्यात नव्याने टपरी, हॉटेल व ढाबा सुरू होताच स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्रीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे.

टपरी, हॉटेल व ढाब्याचे हप्ते मिळतात त्या टपरी, हॉटेल व ढाब्यावर नागरिकांच्या तक्रारी आल्यावर केवळ कारवाईचे नाट्य केले जाते. पोलिसच कारवाई करताना तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव सांगतात. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांच्या विरुद्ध कोणी बोलत नसल्याने राजरोसपणे किंमतीच्या दुप्पटीने बॉटली विकली जाते. काही हॉटेल व ढाबे चालकांनी वाईन व बियर बारची परवानगी घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला हाताशी धरुन नावालाच भिंती उभारून परवानगी घेतली आहे.

घोरावडेश्‍वर ते लोणावळा हद्दीत महामार्गालगत असलेल्या हॉटेल व ढाब्यावर अवजड वाहनचालक जेवणासाठी थांबतात, त्यांना दारू अधिक किमंतीने होत असल्याने ते दारू पिवून नशेत भरधाव वाहने चालवून अपघात करतात. या मद्यपी वाहनचालकांमुळे महामार्गावर दुचाकी व पादचाऱ्यांचा बळी जात आहे.

महिना पाच हजार रुपयांचा हप्ता…
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा खासगी व्यक्ती अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या टपरी, हॉटेल व ढाबे चालकाकडून कमीत कमी पाच रुपयांपासून पुढे रक्‍कम घेतात. त्यात स्थानिक पोलीस व अधिकारी यांचे वेगळे हप्ते असल्याने टपरी, हॉटेल व ढाबे चालक पोलिसांसमोरच दारू विक्री करतात. दारू काचेच्या ग्लासमध्ये न देता स्टीलच्या ग्लासमध्ये दिली जाते. दारू विक्री होत नसल्याचे सांगत आहेत. पोलिसांना ही अवैधरित्या दारू विक्री दिसत नाही, हे नवलच आहे.

पोलिसांकडून अवैध धंद्यांना संरक्षण…
टपरी, हॉटेल व ढाब्यावर दारू पिवून मद्यपी रस्त्यातच पडतात. या अवैध दारू धंद्यामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन होत असून, त्यांचा प्रसंगी मृत्यू होत आहे. व्यसनाधीन पती-पत्नीला मारहाण करुन त्यांचे संसार उद्धवस्त होत आहे. मावळ तालुक्‍यातील तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, वडगाव, कामशेत व लोणावळा हद्दीत अवैधरित्या दारू धंद्यांना संरक्षण दिले आहे.

पोलिसांचे मात्र तोंडावर बोट
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिक दारू धंदे ते पोलीस ठाणे जोरात असा पोलीस अधिकाऱ्यांचा फंडा आहे. दारूच्या व्यसनामुळे भांडणे, भांडणातून गुन्हे आणि गुन्ह्यातून आरोपी तसेच आरोपीकडून रक्कम स्वीकारुन गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जाते. काही अधिकारी व पोलीस वरिष्ठांना हप्ते द्यावे लागत असल्याने पूर्वीपेक्षा अधिक हप्ते वाढवून घेत आहेत. त्यातच मटका, जुगार, वेश्‍याव्यवसाय, भंगार चोरी आदी धंद्यात वाढ झाली. आता तर पोलिसच अवैधरित्या धंदे चालू नसल्याची कबुली देत आहेत.

दारू धंद्यांमुळे युवक व्यसनाधीन होवून किरकोळ भांडणातून खुनाच्या घटनेत वाढ होत आहे. तसेच यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात आहे. अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या टपरी, हॉटेल व ढाबे चालकांना पोलिसच संरक्षण देत आहेत. अवैध धंद्यांच्या बातमी प्रसिद्ध करणाऱ्या बातमीदारवर “वॉच’ ठेवला जातो. त्याच्यावर पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात. त्यांची नावे गुंडांना सांगतात. सामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे.

मावळ तालुक्‍यातील अधिकृत दारू दुकाने हे सर्रासपणे टपऱ्या, हॉटेल व ढाब्यांना मोठ्या प्रमाणात दारू विकतात. दारू वितरण करणारी वाहने टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर पोहच करतात. मद्यपी वाहनचालकांमुळे महामार्गावर अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. महामार्गावरील प्रवास सुखरूपपणे होण्यासाठी महामार्गाच्या बाजूच्या अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मावळ तालुक्‍यातील देहूरोड व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर बेधडकपणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच वेश्‍या व्यवसाय रोखण्यासाठी दामिनी पथकाकडे जबाबदारी सोपविली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्यास “त्या’ अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
– तेजस्वी सातपुते,
अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)