अविष्कारांचे अपयश…

त्या दिवशी अचानक सागरचा फोन आला, मला म्हणाला पुण्याहून गावाकडे येतोय आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी कुठे भेटतो, मी बोललो अमुक ठिकाणी भेटेन पोहोचल्यावर फोन कर आणि आपण भेटू. त्या निमित्ताने जरा बोलणं पण होईल. त्याला औषधे मिळाली व मला फोन करून म्हणाला जरा घाईत आहे पुन्हा भेटू गावी आल्यावर!

सागरशी नातं म्हणजे आम्ही बालवाडीपासून एकाच वर्गात, एकाच बाकावर बसायचो. एकत्र शाळेत जाणं येणं, एकत्र जेवणं, खेळणे फिरणे सर्व काही एकत्र. आणि सागर एकदम साधा सरळ सोज्वळ मुलगा, पुण्यात एका खाजगी कंपनीत तो कामावर रुजू होता तरी त्याच दैनंदिन कामकाज अतिशय चाकोरीबद्ध असायचे, कंपनी ते थेट घर हा त्याचा रोजचा उपक्रम असायचा. दोघात काही अडी-अडचणी असतील तर कधी एकमेकांपासून लपल्या नाहीत. पहिल्यापासून एकत्र असल्याने एकमेकांचा इतिहास भूगोल प्रत्येकाला माहीत त्यामुळे लपवून ही काहीच उपयोग व्हायचा नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु 4 वर्षापूर्वी सागरच लग्न झाल्यावर तो वास्तव्याला पुण्याला गेला होता. त्यानंतर फोनवर वरचेवर बोलणं चालू असायचं. पण तो कधी गावी आल्यावर मात्र गप्पांचा फड़च रंगायचा, इतका की कधी 11-12 वाजले हे घरच्यांचे काही अर्वाच्य शब्द कानी पडल्यावरच तो फड़ मोडायचा. दिवस अगदी मजेत चालू होते.

परंतु एक दिवस अशी घटना घडली की त्यामुळे सागरच्या कौटुंबिक आयुष्यात कलह निर्माण झाला. त्याची समस्या एवढी देखील भीषण नव्हती की ती सुटू शकणार नाही. यातच एक दिवस त्याच्याशी भेट झाली आणि पहिल्या क्षणातच डबडबलेल्या डोळ्याने त्याने एक निराशावादी प्रश्‍न केला की मी या समस्येतुन बाहेर तर पडेल ना? मी त्याच्या खांद्यावर हाथ ठेवून आधार देत बोललो नक्कीच पडशील काळजी करू नकोस! आणि थोड्या वेळेच्या चर्चेनंतर तो निघून गेला.

दोन दिवसांनी मी कामात व्यस्त असताना एक फोन आला आणि जणू पायाखालील जमीन सरकली, मन मानायला तयार नव्हते. फोन वरील व्यक्ती सांगत होती सागर गेला आणि त्याने स्वहस्ते आपलं जीवन संपवले! डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते आणि सतत मनापासुन वाटत होते की फोन केलेल्या व्यक्तीचा पुन्हा फोन यावा आणि त्याने म्हणावे गंमत केली रे! परंतु
वास्तव टाळता येत नव्हते, आणि क्षणार्धात माझा मित्र असण्याचा अहंकार गळून पडला, मनाला सतत एकच प्रश्‍न भेडसावत होता की, याने हा शेवटच्या टोकाचा निर्णय का घेतला असावा?

आज माणसाने वैज्ञानिक अविष्कारांच्या जोरावर हजारो मैलाचा दुरावा एका बटणावर आणला आहे. मोबाइल, फेसबुक, व्हॉट्‌सअप यांसारख्या साधनांचा वापर करून हजारो मैलाचे अंतर लिलया पार केले. परंतु मनुष्यातील प्रेमाचे, आपुलकीचे अंतर पार करायला मात्र आपले वैज्ञानिक आविष्कार साफ अपयशी ठरले.

कधी भरउन्हात डोईवर हात ठेवून आपुलकीने आपली चौकशी करणारी आजी आपल्याला अतिप्रगत संस्कृती पुढे कधी किळसवाणी वाटू लागली समजलंच नाही. आपल्या या पुढारलेल्या समाजात आपुलकीचा झरा जिवंत ठेवणारी लोक प्रगतीच्या पडद्याआड गेली आणि बाहेरून राजाबिंडा दिसणारा आजचा मनुष्य वाढलेल्या व्यापामुळे निर्माण झालेला ताण, तणाव आणि मानसिक अस्थिरता याला पेलवू शकला नाही आणि तो नकारात्मकतेच्या सागरात अखंड बुडाला.

अहो आजच्या प्रगत संस्कृतीने निश्‍चित आम्हाला वैयक्तिक स्वातंत्र दिले व त्यासोबत बोचरा असा एकटेपणाही दिला. आम्ही जर यश मिळवले तर ते आनंदाने साजरे करून एखाद्याला हसत हसत टाळी देऊ असा हातच आमच्या पासून हिरावून घेतला. आजकालच्या स्पर्धेच्या युगात संघर्षही आला वाट्याला, दुःखही आली, परंतु आम्ही दुःखातही आनंदाने डोक ठेवून अश्रु ढाळू असा खांदा ही आमच्या पासून हिरावला. मनुष्याच्या जीवनात भावनांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्या जर व्यक्त नाही झाल्या तर त्याचा उद्रेक होतो आणि ते व्यक्त करायचं व्यासपीठच शिल्लक राहिलं नाही. आणि आपसूकच माणूस स्वतः ला एकटं समजत जातोय आणि निराशेच्या गर्तेत रुतत जातो.

खरंच कधी हे मानवनिर्मित आविष्कार मनुष्याच्या आंतरिक आयुष्यात प्रवेश करून त्याच्या समस्या वा त्याच्या भावना समजु शकेल का? सध्या तरी हे अशक्‍यच दिसतंय! पण एखादा व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करेल अस नातं तर आपण नक्कीच बनवूयात… कदाचित अचानक आपल्यातून जाणारे सागर आपण थांबवू शकू!

– देवेंद्र शिळीमकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)