#अवलोकन: राजकारण्यांच्या राजकीय रथयात्रा 

दत्तात्रय आंबुलकर 
राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या राजकारणात, विशेषतः निवडणुकीच्या राजकारणात रथयात्रांनी वेळोवेळी चांगलाच हात दिलेला आहे. राज्यासराष्ट्रीय पातळीवर पण हाच अनुभव वेळोवेळी आला असून त्यापैकीच काही निवडक राजकीय रथयात्रांचा हा मागोवा… 
अनेक राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांनी प्रचारासाठी मतदारांना साद घालण्यासाठी रथयात्रांचा प्रभावीपणे वापर केला आहे. त्याची माहितीपुढीलप्रमाणे –
एन.टी. रामाराव – “चैतन्य रथम’ 
“तेलगू देशम’ या नव्या पक्षाची स्थापना करणारे विख्यात तेलगू अभिनेते एन. टी. रामाराव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या निवडणूक प्रचारादरम्यान “प्रचार रथ’ ही संकल्पना प्रचारात आणली. सन 1982 मध्ये आपल्या “चैतन्य रथम’ या प्रचाररथाच्या माध्यमातून नऊ महिन्यांच्या कालावधीदरम्यान एन. टी. रामाराव ऊर्फ एनटीआर यांनी तत्कालीन आंध्र प्रदेशात सुमारे 75 हजार किलोमीटर्सचा व्यापक प्रचार-प्रवास केला होता.
चित्रपटसृष्टीतून येणाऱ्या एनटीआर यांनी त्यांच्या जुन्या व दुर्मीळ अशा शेवरलेट मोटारीचा उपयोग करून विशेष स्वरुपात तयार केलेल्या “चैतन्य रथम’च्या छतावर छोटेखानी आकर्षक मंच, ध्वनिक्षेपक व आकर्षक आसन व्यवस्था, ध्वनिक्षेपक इ.ची व्यवस्था केली होती व त्यामुळे “चैतन्य रथम’ तत्कालीन राजकीय संदर्भात आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरला होता. आपल्या “चैतन्य रथ’ यात्रेतून एनटीआर यांनी 1983 मध्ये होणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात त्यावेळी सत्तारूढ असणाऱ्या कॉंग्रेसला राज्यातील तेलगू भाषकांबद्दल कसलाही आदर अथवा सहानुभूती नाही हे जनसामान्यांना सांगण्यासाठी “या तेलगू तलिक्की’ या राज्यगीताचा भरपूर प्रचार-प्रसार करून त्या प्रभावी प्रचाराद्वारे 1983 च्या निवडणुकीत सत्तारूढ कॉंग्रेसला पराभवाचे आस्मान दाखविले.
चौधरी देवीलाल – “विजय रथ’ 
हरियाणाच्या जाट-बहुल क्षेत्राचे प्रभावी राजकीय पुढारी म्हणून एकेकाळी गाजलेल्या देवीलाल यांनी 1989 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काढलेली “विजय रथ’ यात्रा त्यावेळी राजकीय आश्‍चर्य आणि उत्सुकतेचा विषय ठरला होता. देवीलाल यांच्या “विजय रथ’ या वातानुकूलित वाहनात छोटेखानी खान-पान-यान व आरामदायी कक्षाचा समावेश करण्यात आला होता. “विजय रथ’ यात्रेला मिळालेल्या देवीलाल यांच्या भाषण आणि जनसंपर्काला मिळालेल्या प्रतिसादाचे चित्रीकरण करून त्यावर आधारित 18 “व्हिडिओ रथ’ तयार करून त्याद्वारे राज्यभर जोरदार प्रचार करून त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळविणाऱ्या देवीलाल यांना थेट उपपंतप्रधान होण्याचे राजकीय भाग्य लाभले होते.
लालकृष्ण आडवाणी – “राम रथ यात्रा’ 
या प्रारंभिक राजकीय रथयात्रांमध्ये अनेकार्थांनी गाजली ती भाजपनेते लालकृष्ण आडवाणी यांची “सोमनाथ ते अयोध्या’ ही 1990 मधील “राम रथ यात्रा’. या यात्रेद्वारा आडवणीजींनी गुजराथमधील सोमनाथपासून, उत्तर प्रदेशच्या अयोध्यापर्यंतची प्रदीर्घ “राम रथ’ यात्रा काढून त्याद्वारे भाजप आणि राम मंदिर निर्मितीच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केला होता. आडवाणी यांच्या “राम रथा’साठी टोयाटो मिनी ट्रकचा मोठ्या कल्पकपणे वापर करण्यात आला होता. अयोध्येत राम मंदिर होण्यासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी आयोजित केलेल्या या “राम रथ’यात्रेत लालकृष्ण आडवाणी यांना प्रमोद महाजन, या भाजपच्या तत्कालीन दुसऱ्या फळीतील नेतृत्वाची पण मोठी साथ लाभली होती व या यात्रेनंतर भारतीय राजकारणाच्या मतदारांच्या मानसिकतेत मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले. त्याने भाजपला सत्तेच्या जवळ नेऊन तर पोहोचविलेच, शिवाय 1992 मध्ये विश्‍व हिंदू परिषदेद्वारा अयोध्येत मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या कारसेवा-आंदोलनानंतर अयोध्येतील वादग्रस्त बाबरी ढाचा पण ढासळला गेला.
नरेंद्र मोदी – “नमो रथ’ 
भाजपचे 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या दरम्यान प्रकाशध्वनी यावर आधारित “नमो रथ’ या प्रचार रथांचा उपयोग निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या खुबीने व कल्पकपणे उत्तर प्रदेशात केला. “नमो रथ’ प्रचार योजनेंतर्गत 400 महिंद्र मॅक्‍स मिनी ट्रकवर भाजपचे प्रचार साहित्य, दृक-श्राव्य पद्धतीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेत्यांची भाषणे, नरेंद्र मोदींची निवडक भाषणे इ. सचित्र दाखविण्यात येत होती. उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात 403 विधानसभा मतदारसंघांमध्ये “नमो रथां’नी निवडणूक प्रचाराची एकच राळ उडवून राजकीय प्रचार-प्रसारात लक्षणीय असे परिवर्तन घडवून आणले व याचाच परिणाम म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागी मोठा विजय मिळाला. हा इतिहास तसा ताजाच आहे.
या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 3 नोव्हेंबर 2016 पासून उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काढलेली आलिशान रथया अनेकार्थांनी चर्चिली गेली. दहा चाकांच्या मर्सिडीज बेंझ बसचे रथात रूपांतर करून अखिलेश यादव यांनी प्रचार साहित्य, स्नानगृह, खान-पान सेवा, “वाय-फाय’ व्यवस्था आदीची व्यवस्था केली होती.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)