“अवनी’ची हत्या, हा गुन्हाच : मेनका गांधी 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला घेतले फैलावर 

नवी दिल्ली: अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. ही हत्याच आहे, हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले, असा संताप केंद्रीय मंत्री मनेका गांधी व्यक्‍त करत अवनी वाघिणीची ही हत्याच असल्याचा आरोप त्यांनी केला. एकापाठोपाठ एक असे सलग ट्विट करत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला फैलावर घेतले आहे. वाघिणीवर गोळी झाडणाऱ्या नवाब शाफत अली खान याच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यवतमाळमध्ये “अवनी’ वाघिणीची हत्या झाल्याचा आरोप करत प्राणीप्रेमींनी निषेध व्यक्त केला असतानाच, तिला ठार मारण्याचे आदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर केंद्रीय मंत्री आणि वन्यजीवप्रेमी मनेका गांधी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. अवनीच्या हत्येचे हे प्रकरण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरकसपणे मांडू, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मनेका गांधी म्हणाल्या, प्रत्येकवेळी ते हैदराबाद येथील नेमबाज नवाब शाफत अली खानचा वापर करतात. यावेळी खानने त्याच्या मुलालाही बरोबर घेतले होते. त्याच्या मुलाला हा अधिकार नाही. हे बेकायदा कृत्यच आहे. त्या वाघिणीला पकडण्याऐवजी एखाद्या नेमबाजाच्या हातून या वाघिणीची हत्या करण्यात आली आहे.

शाफतअली खानवर त्यांनी गंभीर आरोप केले. खानने आतापर्यंत 3 वाघिणी किमान 10 बिबटे, काही हत्ती आणि 300 हून अधिक जंगलातील प्राण्यांना मारले आहे. देशद्रोही लोकांना शस्त्रे पुरवणे आणि हैदराबाद येथील एका खून प्रकरणातील तो संशयित आरोपी आहे. तरीही सरकार त्यालाच नेहमी हे काम का देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण मी वरपर्यंत नेणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)