पुणे – पोल्ट्री फॉर्ममध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षे कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
अरूण पोपटराव पिंगळे (वय 53, रा. किवळे, ता. मावळ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलगी, तिचे कुटुंबिय पिंगळे याच्या पोल्ट्री फॉर्म आणि वीटभट्टीवर कामाला होते. पीडित मुलगी अशिक्षित होती.पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना खाद्य देत असत. ती एकटी असताना पिंगळे याने तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रसंग कोणाला सांगितल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने याबाबत कोणाला सांगितले नाही. त्यानंतर अनेकवेळा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरच्या कालावधीत तिचे, कुटुंबियांचे मजुरीचे पैसे पिंगळे याने दिले नाहीत. त्यामुळे ते ठाणे जिल्ह्यातील पडघा पोलीस स्टेशनच्या हद्दीत निघून गेले. तेथे काही दिवसांनी पीडित आजारी पडली. तिला दवाखान्यात नेल्यानंतर ती सहा महिन्याची गर्भवती असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी आईने चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पीडित अशिक्षित असल्याने घटना घडलेली तारिख, वेळ तिला आठवत नाही. मात्र, सन 2014 मध्ये दिवाळीच्या कालावधीत घटना घडल्याचे तिने सांगितले. त्यानुसार याबाबत पडघा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली. तो गुन्हा वडगाव मावळ पोलीस स्टेशनला वर्ग झाला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. डीएनए तपासणीमध्ये बाळ पिंगळे याचे असल्याचा निष्पन्न झाल्याचा पुरावा महत्त्वाचा ठरला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक इक्‍बाल जमाल शेख यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कर्मचारी डी.एल.धनवे आणि एस.एच.मोरे यांनी मदत केली.घटनेच्या वेळी पिंगळे कर्तव्यावर असल्याचा दावा बचाव पक्षातर्फे करण्यात आला. मात्र, हा दावा ऍड. अगरवाल यांनी खोडून काढला. डीएनएवर कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने भादवी कलम 376 (बलात्कार) नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, भादवी कलम 506 (जीवे ठार मारण्याची धमकी देणे) नुसार 1 वर्षे सक्तमजुरी, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पास्को) कलम 4 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड आणि पास्को कलम 5 नुसार 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे फिर्यादीच्या आईशी संवाद
पीडित मुलीचा उलट तपासणी घेण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर आर्थिक अडचणीमुळे तिची आईही न्यायालयात हजर राहू शकली नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज येथील न्यायालयातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी त्यांची साक्ष नोदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)