अल्पवयीन मुलीच्या लैगिंक अत्याचारप्रकरणी ट्युशनच्या शिक्षकाला 10 वर्षे कारावास

पुणे – शिकवणीसाठी येत असलेल्या आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्याला शिक्षकाला न्यायालयाने 10 वर्ष कारावास आणि 16 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

विल्सन सिगामनी डॉसन (45 , रा. श्रावस्तीनगर, घोरपडी) असे शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 8 वर्षीय पीडित मुलीच्या आईने खडक पोलिसांत फिर्याद दिली होती. ही घटना जुलै ते सप्टेंबर 2016 दरम्यान डॉसन शिकवणी घेत असलेल्या ठिकाणी घडली. अतिरीक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी याप्रकरणी सहा साक्षीदार तपासले. त्यातील मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले. मुंढवा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अनिता खेडकर-रासकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तर, पोलीस कर्मचारी बापू शिंदे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

डॉसन हा घरी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता. पीडित मुलगी दोन वर्षांपासून त्याच्याकडे शिकवणीसाठी जात होती. दरम्यान तीन महिन्यांपासून पीडितेला पोटदुखीचा त्रास होत होता. तसेच पीडिता शिकवणीसाठी जाताना खूप रडत होती. तिने पालकांकडे क्‍लासला न जाण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे तिच्या आईने क्‍लासला न जाण्यामागचे कारण विचारले असता हा प्रकार समोर आला. त्यावरून तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दंडाच्या रक्कमेतील 15 हजार रुपये पीडित मुलीच्या आईला देण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)