अल्पवयीन मुलांकडूनच लैंगिक शोषणाचे गुन्हे

पॉस्को अंतर्गत दाखल खटल्यांमध्ये मोबाईलचा वापर सर्वाधिक

संजय कडू

पुणे – अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचार होत आहेत. नकळत्या वयातच अल्पवयीन मुले लैंगिक शोषणाचे कृत्य करत आहेत. या लैंगिक शोषणाला बळीही अल्पवयीन मुले-मुलीच पडत आहेत. सामाजाच्या दुष्टीने विचार करायला लावणारी ही बाब आहे. यातील काही घटनांचा माग काढला असता, काही घटनांमध्ये अत्याचार करणारी मुली ही ई-ऍडिक्‍ट असलेली दिसली. इंटरनेटच्यामाध्यमातून नको त्या गोष्टीं पाहिल्या गेल्याने लैंगिक आकर्षण आणि त्यानंतर लैंगिक शोषणाकडे ही मुले वळलेली दिसली. बाल लैंग़िक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानूसार(पॉस्को) दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये 70 ते 80 टक्के प्रकरणात मोबाईचा वापर झालेला आढळतो. सोशल मिडीयावर ओळख वाढवणे, पॉर्न साईट सर्च करणे, अत्याचाराचे रेकॉडींग करणे आणि संपर्काचे साधण म्हणून गुन्हेगाराने मोबाईलचा वापर केलेला आढळतो.

सध्याच्या पिढीमध्ये ई-ऍडिक्‍शन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ई-तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले झाल्याने तसेच मोबाईलवरही सहजासहजी उपलब्ध होत असल्याने अल्पवयातच लैंगिक आकर्षणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातूनच पुढे लैंगिक शोषणाचे प्रकार घडत आहेत. योग्य वयात आल्यावर ज्या गोष्टी कळायला हव्यात त्या गोष्टी सध्या वयात येण्याअगोदरच कळत आहेत. यामुळे ई-ऍडिक्‍शन अधिकच धोकादायक ठरत आहे. अल्पवयातच नको असलेल्या गोष्टींची उत्सुकता आणि कुतूहल वाढत आहे. महाविद्यलयात असतानाच तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये रहाणे ,लग्नाअगोदरच शरीरसंबंध ठेवणे यात सध्याच्या पिढीला काहीही गौर वाटत नाही. पॉर्न साईट लहान मुलांना बघणे बंदी असताना ती सहजासहजी बघण्यास उपलब्ध होते. यासाठी नेट कॅफेत जाण्याचीही गरज नसते, मोबाईलवरच नेटच्या माध्यमातून अशा साईट सहज उपलब्ध होतात. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांच्या माध्यमातून नको त्या गोष्टींचे उदात्तीकरण होताना दिसत आहे. यामुळे शालेय वयातच मुला-मुलींमध्ये लैगिंक आकर्षण वाढत आहेत. यासर्वांमुळे मुले एका आभासी विश्‍वात जगत असतात. या सर्वगोष्टींचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या ठरत आहेत. यामुळे मुले विचीत्र पद्धतीने विचार करायला लागली आहेत. यातूनच पुढे विकृती निर्माण होते. या निर्माण झालेल्या विकृतीमुळेच अल्पवयातील मुलांकडून लैंगिक शोषणाचे प्रकार घडत आहेत.

पॉक्‍सो कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या खटल्यांपैकी 70 ते 80 टक्के खटल्यांमध्ये मोबाईलचा वापर झालेला आढळतो. एकमेकांशी पिडीत आणि गुन्हेगार यांचे एकमेकांशी संपर्काचे हे प्राथमिक साधण असतेच. शिवाय याव्दारे सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येणे, पॉर्न साईट सर्च करणे आदी गोष्टीही केल्या जातात. यामुळे अल्पवयीन किंवा किशोरवयीन मुले बिघडलेली दिसतात. या मानसिकतेतूनच ते अत्याचाराकडे वळतात
-ऍड.प्रमोद बोंबटकर
(अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील)

अल्पवयीन मुलांमध्ये ई-ऍडिक्‍शनचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पॉर्न साईटला भेट देणे व अश्‍लील क्‍लिप पहाण्याचे प्रकार दिसतात. यासर्वांमुळे किशोर किंवा तरुणवयात ही मुले शरीरसंबंधाबाबत खूपच कॅज्युअल असतात. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या एका तरुणीच्या मते दहा पंधरा हजार मिळत असतील तर महिन्यातून एकदा दोनदा शरीरसंबंध ठेवण्यास काय हरतक आहे? हे एक बोलके उदाहरण आहे.
– अजय दुधाणे(प्रमुख, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र)

पिडीत अल्पवयीन मुलांच्या व्यक्तीमत्वावर मोठा परिणाम झालेला दिसतो. या मुलांमध्ये नैराश्‍य किंवा फोबीया सारखा मानसीक आजार आढळतो. अनेकदा पिडीत मुलांना घरच्यांकडून चूप रहाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पुढे जाऊन यातील काही मुले आत्महत्येकडेही वळतात. यातही एक गोष्ट आशादायक आहे, ती म्हणजे सध्या पिडीत मुलांचे पालक जाब विचारण्यास पुढे येत आहेत. त्यांच्यांकडून मुलावरील अत्याचाराविरोधात कडक भूमिका घेतली जात आहे.
– डॉ.अमोद बोरकर(मानसोपचारतज्ञ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)