अल्पवयीनांमधील वाढती व्यसनाधीनता(भाग एक)

     मृणाल घोळे – मापुस्कर

आजच्या या धकाधकीच्या व विज्ञानक्षम काळात अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढताना दिसून येत आहे. व्यसनाधीनता म्हणजे एखाद्या पदार्थाच्या अथवा गोष्टीच्या आत्यंतिक आहारी जाणे होय. आजच्या काळामध्ये जग हे अधिकाधिक प्रगतमय होत चालले आहे; परंतु त्याचबरोबर व्यक्तींमधील सहनशक्ती, आत्मशक्ती या सर्व गोष्टींचा ऱ्हास होताना दिसून येत आहे.

लहान मुलांमधील व्यसनाधीनता वाढण्याची बरीच कारणे आहेत. व्यसनाधीनता ही दारिद्य्र रेषेखालील मुलांमध्येच नाही, तर धनिक कुटुंबातील मुलांमध्ये देखील अधिकाधिक दिसून येते. दारिद्य्र रेषेखालील मुले ज्या ठिकाणी वास्तव्यास असतात, तेथील जीवनशैली खूप वेगळी असते. उदा. आई ही काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असते तर बहुतांशी अशा परिस्थितीत वडील हे मद्यपान करून घरातील बायका-मुलींना मारहाण करीत असतात. त्यामुळे स्वतःच्या घरीच हे चित्र बघावयास मिळत असेल तर अल्पवयातील मुलांच्या मानसिकतेवर त्याचे गंभीर परिणाम होतात.
त्यांची मानसिकता अशी होते की, आपले वडील व्यसन करीत आहेत, तर आपणही करून बघावे व उत्सुकतेपोटी मद्यपान केल्यानंतर त्यात हळूहळू वाढ होऊन व्यसन करणे, ही गोष्ट सवयीची होते, त्याचबरोबर घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आलेला ताण देखील मद्यपान केल्याने कमी होतो हे लक्षात आल्यावर, ही मुले जास्त प्रमाणात व्यसनांच्या आधीन होतात.

धनिक कुटुंबातील मुलांच्या अडचणी या तर आणखीनच निराळ्या असतात. त्यांना कुटुंबीयांकडून हव्या असलेल्या सर्व गोष्टी अगदी सहज प्राप्त होत असतात व पैसेदेखील खूपच सोप्या पद्धतीने मिळतात. त्याचबरोबर आई-वडील बहुतांशी कामाच्या व्यापात गर्क झालेले असतात. त्यामुळे त्यांचे अनावधानाने मुलांकडे दुर्लक्षच होते. म्हणून आपला एकटेपणा कमी करण्यासाठी तर कधी बाह्यपरिस्थितीकडे आकर्षित होऊन ही मुले व्यसनाधीनतेकडे वळतात.

तसेच या मुलांचे व्यसनाधीनतेकडे वळण्याचे खूप महत्त्वाचे कारण म्हणजे मित्र परिवारात जर कोणी व्यसन करणारे असतील तर मित्रांकडून मद्यपानासाठी तसेच इतरही अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी उद्युक्त केले जाते तर कधी, ‘आपला मित्र व्यसन करतो आणि आपण करत नाही; म्हणजे आपण कोठेतरी त्याच्यापेक्षा कमी आहोत,’ या भावनेने ही मुले व्यसन करू लागतात. कधीकाळी मजा म्हणून केलेल्या गोष्टींच्या सेवनाचे रूपांतर व्यसनाधीनतेमध्ये कधी होते ते या मुलांना उमगत नाही. अल्पवयीन अथवा तरुण्यावस्थेतील मुलांमध्ये खूप वेगवेगळ्या पदार्थांचे व्यसन असलेले आढळून येते. त्यामध्ये अगदी देशी दारूपासून अफूची विविध रूपे व त्याचबरोबर व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, फेविबॉण्ड, थिनर, गुटखा, भांग, पेट्रोल इत्यादींचा समावेश होतो. तर बहुतांशी शाळकरी मुलींमध्ये भाजकी माती खाण्याचेही व्यसन दिसून येते.

व्यसनांमुळे मुलांमध्ये हिंस्त्र भावना व गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. व्यसन करायला मिळावे व त्यासाठी पैशांची नड भागली जावी यासाठी ही मुले चोऱ्या व घरफोड्यांपासून खुनापर्यंत कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे समाजातील गुन्हेगारीचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. तसेच अमली पदार्थांच्या अतिसेवनाने या मुलांमध्ये मानसिक आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)